

बाळासाहेब पांडे
नायगाव : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची अडवणूक, कामकाजातील अनियमितता, वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि अभियंत्यांच्या अधिकृत लॉगिनचा वापर करण्याऐवजी स्वतःच्या लॉगिनवरून घरकुलांचे फोटो अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने नायगाव पंचायत समिती प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी (वर्ग-१) पी. एन. वानखडे यांनी मंगळवारी (दि.३) पंचायत समितीतील डेटा एन्ट्री ऑपरेटर एस. एम. पांडे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पंचायत समिती नायगावच्या कार्यालयाकडून या डेटा एन्ट्री ऑपरेटरला अधिकृत पत्र देण्यात आले असून, त्यामध्ये कार्यमुक्त करण्यामागील कारणांचाही सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयासह वरिष्ठ कार्यालयांकडे वारंवार तक्रारी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कामकाजात नेहमीच गैरमार्गाचा अवलंब होत असल्याचे आणि लाभार्थ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे तक्रारींतून निदर्शनास आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कर्मचाऱ्याला वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही कामकाजात कोणतीही सुधारणा झाली नाही. कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहणे, नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण न करणे आणि त्यामुळे तालुक्यातील घरकुल योजनांच्या कामकाजावर परिणाम होणे, या बाबींचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे.
मूळ प्रस्ताव, बिले आणि FTO जमा करण्याचे आदेश
घरकुल योजनेचे संपूर्ण मूळ प्रस्ताव, देयके, अदा केलेली बिले तसेच स्वाक्षरी केलेल्या FTO (फंड ट्रान्सफर ऑर्डर) यांच्या प्रती तातडीने पंचायत समिती कार्यालयात जमा करण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास अन्य फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पत्राद्वारे गटविकास अधिकारी पी. एन. वानखडे यांनी देण्यात आला आहे.
घरकुल योजना ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. अशा योजनांच्या अंमलबजावणीत लाभार्थ्यांची अडवणूक होणे, कामकाजात दिरंगाई होणे किंवा प्रशासकीय नियमांना बगल दिली जाणे, ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर नायगाव पंचायत समितीने केलेल्या या कारवाईमुळे शासकीय योजनांच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचा संदेश गेला आहे.
वादग्रस्त पांडे यांच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी
यापूर्वीही वादग्रस्त ठरलेल्या एस. एम. पांडे यांच्याविरोधात दैनिक ‘पुढारी’सह इतर वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर त्यांची बिलोली येथे बदली करण्यात आली होती. मात्र, लोकप्रतिनिधींच्या तत्कालीन स्विय सहाय्यकाशी आर्थिक संधान साधून त्यांनी काही महिन्यांतच पुन्हा नायगाव पंचायत समितीत बदली करून घेतली होती. घरकुल योजनेच्या प्रकरणात पांडे यांनी मोठ्या प्रमाणात अफाट संपत्ती जमा केल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू असून, त्यांच्या संपूर्ण गैरव्यवहाराची आणि वैयक्तिक संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.