

नायगाव :तालुक्यातील गडगा गावात तीन वानरे पिसाळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वानरांनी गावातील तीन जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावातील तीन वानरे पिसाळल्याची माहिती समोर आली आहे. या वानरांनी गावातील महाजन पा. भाकरे, महेबूब साब देवकर यांच्या पत्नी आणि चंद्रकला भाकरे यांना चावा घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतात आणि सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या वानरांमुळे आणखी नागरिकांना इजा होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी सतर्क राहावे. वानरांच्या जवळ जाणे, त्यांना डिवचणे किंवा पकडण्याचा स्वतःहून प्रयत्न करणे टाळावे. विशेषतः लहान मुलांनी घराबाहेर एकट्याने फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.