

BJP candidates petitions dismissed
मुखेड: मुखेड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर भाजप उमेदवारांनी विरोधी पक्षांचे उमेदवारी अर्ज अवैध असल्याचा आक्षेप घेतला होता. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व आक्षेप फेटाळून उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. यावरून भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने या निर्णयाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेत अंजली करण रोडगे यांनी विरोधी उमेदवाराविरुद्ध आक्षेप नोंदवला, मुस्तफा पठाण यांनी जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतला. तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया राम पाटेवार यांनी विरोधी उमेदवाराच्या शपथपत्रातील मुळ मालमत्ता न दर्शविल्याचा तसेच नोटरीच्या बाजूला उमेदवाराच्या स्वाक्षरी नसल्याचा आक्षेप नोंदवला होता.
सुनावणीत अपिलार्थी (भाजप) व गैर-अपिलाथी (शिवसेना शिंदे गट) यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. मंगळवारी (दि. २५) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संतोष देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारीचा निर्णय कायम ठेवला आणि या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या.
अपिलाथी (भाजप) वतीने अॅड. कनक दंडे व अॅड. मिलिंद एकबोटे यांनी युक्तिवाद केला, तर गैर-अपिलार्थी (शिवसेना शिंदे गट) वतीने मेदगे यांनी युक्तिवाद सादर केला. सरकारी पक्षाकडून अॅड. महेश कांगणे यांनी काम पाहिले.