

मुखेड : शहरातील राज्य महामार्ग क्रमांक २५१ वर शुक्रवारी (दि.२७) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, नरसीहून मुखेडकडे येणारी कार (MH 29 CB 2798) आणि मुखेडहून नरसीकडे जाणाऱ्या दुचाकीची (MH 26 AM 0448) गरुडकर पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार बालाजी गणपती गायकवाड (वय ४३, रा. तांदळी) आणि मारोती भुजंग जांभळीकर (वय ३२) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, बालाजी गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दोन्ही मांड्यांची हाडे मोडली आहेत. तर, मारोती जांभळीकर यांच्याही डोक्याला मार लागला असून त्यांची उजवी मांडी मोडली आहे. एका जखमीच्या पायाचे हाड कारच्या बोनेटमध्ये अडकले होते. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम झाडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नांदेडला पाठवले आहे.
दरम्यान, या अपघाताला रस्त्याच्या निकृष्ट कामाला जबाबदार धरत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य महामार्ग क्रमांक २५१ च्या रुंदीकरणासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. या खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून भविष्यातील अपघात टाळावेत, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.