

प्रमोद चौधरी, नांदेड
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुखदायी प्रवास व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या नांदेड आगाराने लांबपल्ला व ग्रामीण भागात जादा बसेसची व्यवस्था केली होती. १७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या १७ दिवसांत लालपरीने विभागाला १० कोटी २४ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
नांदेड विभागातील नांदेड, भोकर, किनवट, मुदखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली व माहूर या ९ आगारांतून पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, नागपूर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, यवतमाळ, पुसद, मुंबई, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, चंद्रपूर, निझामाबाद व ग्रामीण भागात फेऱ्यांची संख्या वाढविली होती. त्यामुळे प्रवाशांना आपापल्या घरी जाणे सोयीचे झाले होते. प्रवाशांनी खासगी वाहनांचा वापर न करता महामंडळाच्या एसटीने प्रवास केल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात १७ दिवसांत मोठी वाढ झाली आहे.
आगारनिहाय उत्पन्न (लाखांत)
नांदेड २२४.२६
मुरखेड १२१.१०
देगलूर १२९.७०
कंधार १२५.५६
बिलोली १०५.२२
हदगाव ९०.८५
भोकर ८४.९४
किनवट ८३.९२
माहूर ५९.३७
एसटी महामंडळ नेहमीच प्रवाशांना प्रवासी दैवत मानते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी व इतर प्रवाशांना घर जवळ करता यावे यासाठी एसटी महामंडळाने लांबपल्ला व ग्रामीण भागात जादा बसेसची व्यवस्था केली होती. प्रवाशांनी या सेवेला उदंड प्रतिसाद देत प्रवास केला आहे. यापुढेही प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभाग नियंत्रक नांदेड
१७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या १७ दिवसांत नांदेड विभागातील ९ आगारांनी १० कोटी २४ लाख ८९ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त केला आहे. प्रवाशांनी दाखविलेला विश्वास आणि महामंडळाच्या नियोजनामुळे हे यश मिळाल्याचे विभाग नियंत्रक डा. चंद्रकांत वडस्कर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.