

धोंडीबा बोरगावे
फुलवळ: फुलवळ ता. कंधार येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मणराव मंगनाळे यांच्या तरुण पुत्राने अतिवृष्टी , नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून ता.२१ ऑगस्ट रोज गुरुवारी सकाळी आठ वाजता गळफास घेऊन घेऊन जीवन संपवले. याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने आपल्या पोटचा गोळा गेला या मानसिकतेत मुलाच्या विरहात ता.२२ ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी आठ वाजता म्हणजेच केवळ चोवीस तासातच आईचे दुःखद निधन झाले. एकाच कुटुंबावर कोसळलेले हे दुहेरी संकट पाहून गावावर शोककळा पसरली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.
अधिक माहिती अशी की, घरातला कर्ता मुलगा सूर्यकांत लक्ष्मणराव मंगनाळे यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काल ४:३० वाजता मयत सूर्यकांत मंगनाळे यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यासाठीच आलेल्यापैकी काही पाहुणे अजून परत जायचे शिल्लक असतांनाच हे कुटुंबीय बसलेल्या या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच. त्याचेच दुःख संपण्यापूर्वीच अवघ्या चोवीस तासातच आई देऊबाई लक्ष्मणराव मंगनाळे वय ७० वर्ष यांनी सदर घटनेची धास्ती घेतली आणि त्यातच ता .२२ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता त्यांचे दुःखद दुर्दैवी निधन झाले.
घडलेल्या सदर दुहेरी दुःखद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. देऊबाई मंगनाळे यांच्यावर दुपारी ३:३० वाजता फुलवळ येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पती , एक मुलगा , एक मुलगी , दोन सुना , नातवंड असा मोठा परिवार आहे.