

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलिस दलात ३५ वर्षाहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी बजावून पोलिस संशोधन व विकास महासंचालक पदावरून निवृत्त झालेल्या धडाडीच्या आयपीएस अधिकारी डॉ. मीरां चड्डा-बोरवणकर यांना यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रूपये असे स्वरूप असलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. बोरवणकर यांना ८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार्या विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार असल्याचे अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे संजीव कुळकर्णी व हेमंत मिरखेलकर यांनी जाहीर केले. ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ मागील तीन दशकांपासून दिल्या जाणार्या या पुरस्काराने विविध क्षेत्रांतील नामवंतांना गौरविण्यात आल्यानंतर अलीकडच्या काळात 'मॅडम कमिशनर' या पुस्तकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बोरवणकर यांचे नाव प्रतिष्ठानने एकमताने निश्चित केले.
यासंदर्भात झालेल्या बैठकीस डॉ. सुधीर रसाळ, न्यायमूर्ती सुनील देशमुख, डॉ. अजित भागवत, डॉ. सविता पानट, डॉ. आनंद निकाळजे, राधाकृष्ण मुळी, डॉ. मंगेश पानट आदी उपस्थित होते. पुरस्काराचे वितरण मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात न्या. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या विशेष कार्यक्रमात होणार असून, पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बोरवणकर यांचे 'पोलिस, राज्यकर्ते व समाज आव्हाने आणि उपाय' या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत भालेराव प्रतिष्ठानने केले आहे.