माहूर तालुक्यात टंचाईचा कहर

Nanded news | मागील आर्थिक वर्षात ‘जलजीवन मिशन’ला निधीच नाही; महिलांचा पं.स.मध्ये ठिय्या
माहूर तालुक्यात टंचाईचा कहर
Published on
Updated on

वसंत कपाटे

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेला सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात निधी न मिळाल्याने बहुतांश कामे ठप्प पडली आहेत. इवळेश्वर या एका गावाचा अपवाद वगळता उर्वरित गावांत जलजीवन मिशनची कामे रेंगाळली असून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टंचाईमुळे संतप्त झालेल्या वायफणी येथील आदिवासी महिलांनी शिंदे गटाचे अर्थात सत्ताधारी पक्षाचे नेते पिंटू आशीर्वाद पाटील यांच्या नेतृवात २१ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती असून त्यापैकी ५१ ग्रामपंचायत मधील जलजीवन मिशनच्या कामांना २०२२ व २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र निधीअभावी या कामांची गती अत्यंत मंदावली आहे.

शासनाने या योजनांसाठी तब्बल ५३ कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी मागील आर्थिक वर्षात एक रुपयाही वितरित केला नाही. यापूर्वी ४ मार्च २०२५ रोजी केवळ १२ कोटी २२ लाख ४५ हजार रुपयांचा अपुरा निधी तोही संपूर्ण जिल्ह्यासाठी दिला होता. कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला असता, ३ गावांमध्ये कामे केवळ ० ते २५ टक्क्यांपर्यंत झाली आहेत. ९ गावांमध्ये २५ ते ५० टक्के, तर २१ गावांमध्ये ५० ते ७५ टक्के इतकीच प्रगती झाली आहे. १७ गावांमध्ये कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचली असली तरी निधी अभावी ती कामे अंतिम टप्प्यात अडकली आहेत. दरम्यान, दि. २१ एप्रिल रोजी वायफणी येथील विजयामाला कुरसंगे, कांताबाई किनाके, संगीता किनाके, सुमनबाई मेश्राम अनराधा सलाम व निकिता सलाम या आदिवासी महिलांनी इतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांसमवेत पंचायत समिती कार्यालय गाठून सहायक गटविकास अधिकारी पी. डी. मुरादे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

निधीअभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांमुळे माहूर तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत असल्यामुळे, तातडीने निधी उपलब्ध करून कामांना गती देण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे.

निधी जिल्हास्तरावर प्राप्त होतो, तो किती मिळाला किंवा मिळाला नाही, याची माहिती जिल्हा स्तरावरूनच उपलब्ध होईल.

-प्रमोद बनसोड, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news