नायगाव: महाराष्ट्राच्या राजकारणात कणखरपणा, शिस्त आणि विकासाचा ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेडगेवार चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी अन्न–लोहा–कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमचे लाडके, कणखर, प्रेमळ आणि सदैव मार्गदर्शक असलेले अजितदादा आपल्यातून निघून गेले, हे वास्तव स्वीकारणं कठीण आहे. ही बातमी ऐकताच डोळ्यासमोर अंधार दाटून आला. महाराष्ट्राने आज विकासासाठी झटणारे, शब्दाला जागणारे आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व गमावले आहे.” कामाप्रती प्रचंड निष्ठा, प्रशासनावर पकड आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार ओळखले जात होते. त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे त्यांनी प्रशासनात वेगळा दरारा निर्माण केला होता. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा खरा लोकनेता होता. ते केवळ नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांच्या हृदयात धडधडणारे धैर्य होते.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि लढवय्या वृत्ती सदैव आम्हाला योग्य दिशा दाखवत राहील. दादा आमच्यातून गेले असले, तरी आमच्या हृदयातून कधीच जाणार नाहीत,” अशा शब्दांत होटाळकर यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी दिलीप पाटील धर्माधिकारी, हनुमंतराव पाटील चव्हाण, विराज विजय चव्हाण, बालाजी बच्चेवार, रवींद्र भिलवडे, पोलीस निरीक्षक मार्कंडे, रेखाताई बनसोडे, सोनाली हंबर्डे, पल्लवी वडजे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि नायगाव तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने नायगाव तालुक्याच्या वतीने अजितदादांना कोटी कोटी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.