

किनवट : तालुक्यात बिबट्या आणि अस्वलांचे दर्शन वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातून जाणाऱ्या वाटसरूंना तसेच वाहनधारकांना हे वन्यप्राणी वारंवार दिसत असून, काही ठिकाणी जंगलाशेजारील शेतांमध्येही अस्वल आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मागील काही काळात अस्वलांच्या हल्ल्यांत नागरिक जखमी होण्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्याने किनवट वनविभागाने तातडीने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये सूचना फलक बसवून तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली असून, नागरिकांनी सर्व सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन उपवनसंरक्षक केशन वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक के. पी. चव्हाण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी केले आहे.
वनविभागाने दिलेल्या सूचनांनुसार रात्री शौचासाठी बाहेर पडणे टाळावे, झोपताना घराचे दरवाजे निश्चितपणे बंद करावेत, जंगलात कामगार, शेतकरी किंवा गुरे चारणारे यांनी एकटे न जाता समूहाने जावे, लहान मुलांना घरात किंवा पाळणाघरात सुरक्षित ठेवावे, जंगलात लघु वनउत्पादने गोळा करताना एकत्रितपणे जावे, साळींदर, ससे, रानडुक्कर आणि कोल्हे अशा प्राण्यांची शिकार करू नये ; कारण हे बिबट्याचे भक्ष्य असून, त्यांची संख्या कमी झाल्यास बिबट्यासारखे प्राणी मानवीवस्तीकडे आकर्षित होतात.
बिबट्या किंवा अस्वल दिसल्यास आरडाओरडा करू नये, जंगलात जाताना मोबाईलचा हॉर्न किंवा आवाज करत जावे जेणेकरून मानवी उपस्थितीची जाणीव प्राण्यांना होईल, पहाटे पाचपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर जंगलात जाणे टाळावे, पाळीव प्राणी रात्री घरात सुरक्षित ठेवावेत आणि जंगलाजवळ नेऊ नयेत, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीकाम टाळावे, जंगलातील पाण्याच्या स्रोतांजवळ जाणे टाळावे; कारण अशा ठिकाणी बिबट्या येण्याची शक्यता जास्त असते आणि प्राण्यांवर वा मनुष्यांवर हल्ला झाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.
अचानक बिबट्या किंवा अस्वल समोर आल्यास घाबरू नये, जागेवरच उभे राहून दोन्ही हात शक्य तितके उंच करावेत आणि ठाम आवाजात जोरजोराने ओरडावे, ज्यामुळे या प्राण्यांना समोर आपल्यापेक्षा मोठ्या आकृतीचा प्राणी असल्याचा भास होतो. त्यावेळी बिबट्या एकदा वेळेस ओरडून बहुधा मागे वळून निघून जातो. हे प्राणी दूर अंतरावर असल्यास हळूहळू मागे सरकत परतावे, असा सल्लाही विभागाने दिला आहे. तसेच, कोणत्याही वन्यप्राण्याचे दर्शन झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनसुद्धा वनविभागाने केले आहे.