

अरूण तम्मडवार
किनवट : नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडीच्या उमेदवार सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी सुमारे चार हजार मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळविला. या निकालामागे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी, पक्षांतर्गत समीकरणे आणि मतदारांची बदलती भूमिका कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असताना ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराची निवड झाल्याने भाजपातील काही अनुभवी व इच्छुक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. मागील कार्यकाळात ओबीसी आरक्षण असताना आनंद मच्छेवार यांना संधी देण्यात आली होती. मात्र यावेळी आरक्षण नसताना पुन्हा त्याच कुटुंबात उमेदवारी देण्यात आल्याने अनेक इच्छुक असमाधानी असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाने सर्वेक्षणाचा आधार घेत सौ. पुष्पा आनंद मच्छेवार यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे काही नाराज इच्छुकांमध्ये तटस्थ भूमिका, तर काहींमध्ये विरोधी भूमिका निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
याशिवाय भाजपाची महायुतीबाबतची भूमिका लवकर स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. नामांकनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या युतीनुसार 21 पैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला, तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे तयारी केलेल्या भाजपाच्या काही इच्छुक उमेदवारांचा उत्साह मावळून त्यातील काहींनी पक्षांतर केले, काही अपक्ष म्हणून लढले तर काहींनी तटस्थ भूमिका स्वीकारली. तथापि, पक्षाने केलेली ही युती पूर्णतः अयशस्वी ठरली असेही म्हणता येत नाही. कारण अजित पवार गटाचे सातपैकी पाच, तर शिंदे गटाचा एकमेव उमेदवार विजयी झाला. याउलट भाजपाच्या 13 उमेदवारांपैकी केवळ चार जणांना यश मिळाले. यावरून काही प्रभागांमध्ये उमेदवार निवडीत अपेक्षित ताळमेळ साधला गेला नसावा, असा निष्कर्ष राजकीय जाणकार काढत आहेत.
दुसरीकडे, विजयी उमेदवार सौ. सुजाता एंड्रलवार यांचे सुपुत्र करण एंड्रलवार यांनी नियोजनपूर्वक केलेल्या प्रचारात दाखविलेली जिद्द, संघटनात्मक समन्वय आणि विविध समाजघटकांतून त्यांना मिळालेला पाठिंबा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. एकूण आकडेवारीचा विचार करता, डिसेंबर 2017 आणि सध्याच्या निवडणुकीतील मतदानाच्या प्रमाणात फारसा फरक दिसून येत नाही. 2017 मध्ये एकूण 23,593 मतदारांपैकी 18,166 मतदात्यांनी, म्हणजे सुमारे 77 टक्के मतदान केले होते, तर यंदा 25,593 एकूण मतदारांपैकी 19,008 मतदात्यांनी मतदान करून हा आकडा सुमारे 74 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला. विशेष म्हणजे पूर्वीपेक्षा सुमारे दोन हजार मतदारसंख्या वाढूनही भाजपाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही.
2017 मध्ये आनंद मच्छेवार यांना 6,358 मते मिळाली होती, तर यंदा सौ. पुष्पा मच्छेवार यांना जवळपास तेवढीच, म्हणजे 6,477 मते मिळाली. मागील आठ वर्षांत मतदारसंख्या व मतदानाचा आकडा वाढूनही भाजपाच्या मतांमध्ये केवळ किरकोळ वाढ झाल्याचे स्पष्ट होते. याउलट, विरोधी आघाडीला विविध समाजघटकांतून मिळालेला अतिरिक्त पाठिंबा निर्णायक ठरल्याचे या निकालातून दिसून येते. त्यामुळे हा निकाल केवळ विजय–पराभवापुरता मर्यादित न राहता, बदलत्या मतदार मानसिकतेचा आणि स्थानिक राजकारणातील नव्या समीकरणांचा स्पष्ट संकेत देणारा ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.