Nanded news | किनवटमध्ये मटका-जुगाराविरुद्ध कारवाईची मागणी; अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

आठवडी बाजाराच्या दिवशी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवहारात ओढला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
Nanded news | किनवटमध्ये मटका-जुगाराविरुद्ध कारवाईची मागणी; अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
Published on
Updated on

किनवट : किनवट शहरातील प्रमुख बाजारपेठांसह विविध भागांत मागील अनेक महिन्यांपासून अवैध मटका व जुगार व्यवसाय राजरोसपणे सुरू असून, त्यामुळे गोरगरीब कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तसेच अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत या अवैध धंद्यांवर तात्काळ विशेष मोहीम राबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत कोरडे व माजी शहरप्रमुख संतोष येलचलवार यांनी दिला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक, किनवट पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात शहरातील भाजीपाला मार्केट, मटन मार्केट, बसस्थानक परिसर, सुभाषनगर, समतानगर, हमाल कॉलनी, रेल्वेस्टेशन, गंगानगर, आठवडी बाजार तसेच प्रमुख चौकांमध्ये मिलन, श्रीदेवी, पद्मावती, टाईमबाजार, कल्याण या नावाने मटका बुक्या सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिक दामदुप्पटच्या अपेक्षेने रोजमजुरीतून मिळालेली रक्कम मटक्यात गुंतवून आर्थिकदृष्ट्या बरबाद होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवहारात ओढला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

मटका व्यवसाय चालविणाऱ्यांनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून जाळे उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून मटका बुक्यांच्या ठिकाणी पैशांवरून वादावादी, भांडणे घडत असल्याने सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे कोरडे व येलचलवार यांनी म्हटले आहे. याशिवाय शहरात जुगार अड्डेही दिवसरात्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शहरातील महिला, विद्यार्थी, व्यापारी व सुज्ञ नागरिकांना या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news