

संघपाल वाघमारे
कंधार : महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कंधार नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे शहाजी नळगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार स्वप्निल लुंगारे यांचा २३४९ मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. आणि नगरपालीकेचे सूत्र पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.
कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजी नळगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हणमंत उर्फ स्वप्निल लुंगारे यांचा पराभव करत बाजी मारली. नगरपालिकेच्या दहा प्रभागात वीस जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १०, काँग्रेस पक्षाने - ५, अपक्ष उमेदवारांनी ३, शिवसेना शिंदे गट १ जागा, वंचित बहुजन आघाडीने १ जागा मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे, त्यांचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत परंतु नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. परंतु बहुमत नाही. नगरपालिकेचा २०१६ च्या निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला होता परंतु, त्यांच्याकडे सत्ता नव्हती अशीच ही स्थिती २०२५च्या निवडणुकीत निर्माण झाली आहे.
कंधार नगरपालिकेत एक आगळा वेगळा आणि लक्षवेधी निकाल लागला आहे. कंधार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 (ब) मधून एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता मयुर नळदकर यांना मतदान ६७७ मतदान झाले, तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भोसीकर यांची सुनबाई संजीवनीताई यांना ५२७ मतदान झाले. तब्बल १५० मतांनी पराभूत करून एकहाती विजय मिळवला आहे.
५० वर्षांचा वनवास संपला! वैदू समाजाचा पहिला नगरसेवक झाला. राजकारणाच्या परिघाबाहेर राहिलेल्या भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे डॉ. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वप्न नांदेडच्या सत्यात उतरले आहे. कंधार नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप संतराम देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ५० वर्षांतील वैदू समाजाचे पहिले नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या भटक्या समाजातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून तिकीट दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित समाजाला न्याय दिला आहे. असे दिलीप संतराम देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांबळे सविता गंगाधर यांनी प्रभाग क्र.९ (अ) मधून निवडणूक लढवली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांबळे सविता गंगाधर यांचा केवळ चार मताने पराभव झाला आहे. या विजयामुळे कंधार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नगरपालिका निवडणूकीत माजी उपनगराध्यक्ष हमीद सुलेमान, माजी नगरसेवक दीपक बडवणे, माजी नगरसेविका पारुबाई पवार, माजी नगरसेविका वर्षा कुंटेवार या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे.
नगरपालिका निवडणूकीत माजी नगराध्यक्षा अनुराधा केंद्रे, माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोदिन, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे, माजी नगरसेविका शेख अजमेरी यांना नगरपालिकेमध्ये पुन्हा संधी मिळाली आहे.
यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत ३५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी फक्त १० महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. कंधार नगरपालिकेचा हा निकाल आगामी सत्तास्थापना आणि स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.