

नांदेड : जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई दरम्यान धावणाऱ्या लोकप्रिय ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या विस्ताराला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. हा रेल्वे प्रवास आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आला असून, या निर्णयामुळे नांदेड आणि परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे बोर्डाने बुधवारी (दि. १२) या संदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे.
या निर्णयानुसार, गाडी क्रमांक २०७०५ हजूर साहिब नांदेड-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस दररोज सकाळी ५ वाजता नांदेड रेल्वे स्थानकातून सुटेल. परभणी येथे सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचून ५ वाजून ४२ मिनिटांनी पुढे निघेल. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबा घेत दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी (CSMT), मुंबई येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक २०७०६ सीएसएमटी-हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्सप्रेस दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सीएसएमटी, मुंबई येथून प्रस्थान करेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी स्थानकांवर थांबत रात्री १० वाजून ५० मिनिटांनी नांदेड येथे पोहोचेल.
या विस्तारित गाडीला नांदेड-परभणी मार्गावर परभणी स्थानकावर व्यावसायिक थांबा देण्यात आला आहे. गाडीची प्राथमिक देखभाल नांदेड येथे केली जाईल. ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, नांदेड येथून दर बुधवारी आणि सीएसएमटी, मुंबई येथून दर गुरुवारी ही गाडी धावणार नाही. ही गाडी २२२२६/२२२२५ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेससोबत एकत्रित रेक सामायिकरण पद्धतीने (integrated raking) चालवली जाईल.
रेल्वे बोर्डाने या विस्ताराची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक असल्यास, या मार्गावर उद्घाटन फेरीसाठी विशेष गाडी चालवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच, या नवीन सेवेबद्दल प्रवाशांना माहिती देण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे महत्त्वपूर्ण पत्र रेल्वे बोर्डाचे संचालक (प्रशिक्षण) संजय आर. नीलम यांच्या स्वाक्षरीने जारी केले आहे.