

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी (Indira Gandhi Death Anniversary) गुरुवारी देशभरात साजरी केली असताना मराठवाड्यात इंदिराजींचे भरकटलेले हेलिकॉप्टर आणि खास त्यांच्यासाठी किनवट येथे उभारलेले प्रियदर्शिनी विमानतळ या दोन प्रसंगाची चर्चा डोळ्यासमोर येते.
सूर्यकांता पाटील आमदार कशा झाल्या? याचीही एक स्टोरी आहे. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांचा एक कार्यक्रम नांदेडला आयोजित करण्यात आला होता. पण इंदिराजींचे हेलिकॉप्टर भरकटले व ते वसमतला उतरले. तेथे स्थानिक नेते मुंजाजीराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. तोपर्यंत सूर्यकांता पाटील कारने वसमत येथे दाखल झाल्या. त्या इंदिराजींना नांदेड येथे विश्रामगृहावर घेऊन गेल्या. तेथे गेल्यावर इंदिराजींना फ्रेश व्हायचे होते. त्यावेळी इंदिराजींनी त्यांना साडी मागितली. सूर्यकांताबाईंनी तातडीने साड्या आणल्यावर ‘मै ऐसे साडी पहनती हूँ क्या,’ असे इंदिराजी म्हणाल्या. ‘तू ऐसा कर...बाहर जा.. मै नहाती हूँ.. साडी सुखाने के लिए मेरी मदद कर,’ असे त्या सूर्यकांता यांना म्हणाल्या. त्यानंतर दरवाजा बंद करून इंदिराजी फ्रेश झाल्या व त्यांनी साडी धुतली. त्यानंतर खोलीतील पंख्याचा स्पिड वाढवून सूर्यकांता व त्यांनी साडी वाळविली. हा प्रसंग लक्षात ठेवत इंदिरा गांधी यांनी नंतरच्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांना हदगाव तर मुंजाजीराव जाधवांना वसमतमधून उमेदवारी दिली. पहिल्यांदा तू विधानसभा लढव, मग लोकसभेचे बघू, असा सल्ल्ला त्यांनी दिला.
1984 पूर्वी पंतप्रधान व अन्य नेत्यांना भेटणे फारसे अवघड नव्हते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी व अन्य नेत्यांशी बीडच्या खासदार केशरकाकूंची जवळीक होती. केशरकाकूंच्या झालेल्या एका सभेला व्यासपीठावर इंदिराजी, केशरकाकू आणि प्रेमलाताई चव्हाण तिन्ही महिलाच होत्या. एकदा साखर कारखाना उभारणीला परवानगी मिळावी म्हणून केशरकाकू इंदिराजींकडे गेल्या होत्या. तेव्हा इंदिराजी घाईगडबडीत होत्या, त्यांनी टेबलावर पेन्सिल आपटली आणि त्या काकूंना म्हणाल्या, जल्दी बोलो मुझे बाहर जाना है. काकू म्हणाल्या, ‘आपने पेन्सिल टेबलपर पट्क दी, मैं डर गई हूं. मैं अभी नहीं कह सकती. मुझे हिन्दी अभी आती नहीं.’. नंतर त्या जेव्हा इंदिराजींना भेटल्या तेव्हा त्यांची कारखाना काढण्याची मानसिकता पाहून इंदिराजीही चकित झाल्या. महिला नेत्या साखर कारखाना कसा काय काढू शकतात?, असा प्रश्न इंदिराजींसमोर होता, पण काकूंनी त्यांच्या मनातील शंका दूर केली. दुसर्या भेटीत बीड दूरदर्शन केंद्र त्यांनी मंजूर करून आणले.
किनवट तालुक्यातील राजगड येथे 1972 मध्ये ‘प्रियदर्शनी’(इंदिरा गांधी यांचे नाव) नावाचे छोटेसे विमानतळ तयार करण्यात आले. त्याचे उद्घाटन त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. या विमानतळ निर्मितीमागील कथा म्हणजे इंदिरा गांधी यांनी 1960 मध्ये दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी राजपथावर किनवट तालुक्यातील जवरला व बुधवारपेठ या गावांच्या आदिवासींचे ढेमसा व दंडार हे लोकनृत्य त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरू सोबत पाहिले होते. तेंव्हा काढलेला एक फोटो पुढे काही वर्षानंतर त्या स्वत: पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या पाहण्यात आला. तेव्हा त्यांनी परत एकदा किनवट तालुक्यातील आदिवासींची पारंपरिक लोकनृत्ये प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्यांना कसेही करून या भागात आणून काही विकास पदरात पाडून घेऊ या इच्छेने आ. राठोड यांनी अक्षरश: त्यावेळेसच्या रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या श्रमदानातून या ठिकाणी ‘हेलिपॅड’ तयार करून घेतला. रंगीत तालीम म्हणून एका हेलीकॉप्टरमध्ये दोन-तीन प्रवाशांसह उड्डानाचे एक दिवसीय प्रात्यक्षिकही प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे स-शुल्क पार पडले. मात्र दुर्देवाने पुढे काही कारणास्तव श्रीमती गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात झाली. पुढे या धावपट्टीबाबत 2021 पर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने प्रश्नच उपस्थित केला नाही, त्यामुळे हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहिले.
त्यानंतर तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना, त्यांनी या आदिवासी भागाला आपात्कालीन प्रसंगी तत्काळ संपर्क करता यावा, यासाठी राजगड येथे उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देऊ, अशी घोषणा केली होती. तसेच खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती. तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे, तसेच या ठिकाणाहून विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागला. त्या अनुषंगाने त्यांनी तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांची भेट घेऊन खा. हेमंत पाटील यांनी या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि याठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावे. तसेच या ठिकाणी वैमानिक आणि हवाई सुंदरींचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे, जेणेकरून या भागातील आदिवासी बहुल समाजातील तरुण व तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विचार त्यांनी व्यक्त केला होता. या सर्व पुढाऱ्यांच्या प्रयत्नानंतरही या विमानतळाचा विकास न झाल्यामुळे तिथे आता केवळ कुरण तयार झालेले दिसते.
(किनवट संदर्भ : अरूण तम्मडवार)