

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड तालुका राष्ट्रीय हरित लवाद द्वारे हरित पट्टा (ग्रीन झोन) घोषित असल्याने वाळू उपसा करण्यासाठी अनेक वर्षांपासून पावबंद आहे. तरीही येथील 'शंखतीर्थ' नावाचा घाट आता 'अमर घाट' म्हणून जिल्ह्यात सर्वार्थान प्रसिद्ध झाला असून भर पावसातही येथे वाळू उपसा सुरूच आहे. त्या पाठोपाठ आता 'टाकळी'तही 'गुजराती' बोट अवतरली असून खुस्कीच्या मार्गाने वाळूचा बेधडक उपसा चालूच असल्याने तालुक्यातील घाटाघाटात वाळू माफियांच्या 'अमर कहाणी'ची जोरदार चर्चा आहे.
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मुकेश कांबळे यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करत मुदखेड तालुक्यातील बेसुमार वाळू उपशावर पावबंद आणण्यासाठी कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु अजूनही बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने त्यांच्या पत्राला महसूल प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकले आहे. चोर पिंपळकोटा येथील एका 'मारोती' नावाच्या व्यक्तीनेही वाळू उपशावर पावबंद घालावा अशी विनंती केली होती परंतू प्रशासनाला वेगळाच 'मारोती' राया प्रसन्न असावा अशी चर्चा तालुक्यात आहे.
सध्या टाकळी, शंखतीर्थ या घाटावर राजकीय आश्रयाने लाखो रुपयांच्या अत्याधुनिक बोटीतून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे. या दोन्ही घाटातून वाळूचा उपसा करून तालुक्यातील अडगळीच्या भागात वाळूचा साठा करून रोज रात्रीच्या वेळी वाळूची विक्री केली जाते, अशी चर्चा आहे.
तालुक्यातील अवैध व भरधाव वाळू वाहतुकीमूळे कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाकडे ड्रोनची व्यवस्था असूनही नेहमीसाठी शंखतीर्थ व टाकळी घाटावर ते का सोडले जात नाहीत? याचे अर्थपूर्ण उत्तर कसे मिळणार? हा प्रश्न आहे. तालुक्यातील याच दोन घाटांवर महसूल प्रशासन का पोहचत नाही? हा संशोधनाचा विषय आहे. भर दिवसा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून 'शंखतीर्थ व टाकळी' घाटावर वाळू उपसा सुरु असतांना जिल्ह्यातील धाडी टाकणारे पथके कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत? असा प्रश्न निर्माण होतो.
आम्ही जिथे माहिती भेटली तिथे कार्यवाही करून बोटी उद्धस्त करत आहोत. असे असले तरीही 'टाकळी व शंखतीर्थ' येथील बोटींवर कोण कार्यवाही करणार? आणि तिथे दररोज पथक पाठवून आजूबाजूची वाळू जप्त करत प्रत्येक बोट उद्धस्त केली जाणार का? याचे उत्तर प्रशासनाकडून हवे आहे.