

Illegal teak worth 70 thousand seized again in Apparao Peth
किनवट, पुढारी वृत्तसेवा अप्पारावपेठ परिसरात अवैध सागी तस्करांविरुद्ध वनविभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेत सातत्य दिसून येत असून, काल सोमवारी (दि. एक) ८५ हजार रुपयांचा सागवान जप्त करण्याची कारवाई ताजी असतानाच, आज मंगळवारी (दि.२) पुन्हा एकदा सुमारे ७० हजार रुपयांचा अवैध सागीमाल जप्त करण्यात आला आहे. या सलग कारवायांमुळे सागी तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक श्रीकांत इटलोड यांच्या नियंत्रण-ाखाली आज सकाळी ११ च्या सुमारास मौजे अप्पारावपेठ येथे धाड टाकण्यात आली. यात गावातीलच आरोपी दत्तात्रय गजराम तोटावार (वय ३६) व यलय्या सायन्ना मलाकंटी (वय ४५) यांच्या घर व गोठ्यांची तपासणी केली असता, दोन आरा यंत्र (किंमत १५ हजार) तसेच कटसाईज सागी ८४ नग (घनमीटर १.९९९), गोल माल ४ नग (घनमीटर ०.२९६), असा एकूण २.२९५ घनमीटर सागीमाल जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत सुमारे ६९ हजार ५३८ रुपये एवढी आहे.
या धाडीत अप्पारावपेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे, इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश भोसले, तसेच अप्पारावपेठ, इस्लापूर व बोधडी येथील वनकर्मचाऱ्यांमध्ये वनपाल श्रीराम सज्जन, सय्यद वसीम, शेख काझी, कमलाकर खरात, गणेश पवार, रमेश कोलते, दीपाली सोनाळे, समाधान राऊत तसेच वनरक्षक रघुनाथ वनवे, डी.डी. कडमपले, कृष्णा घायाळ, गीता डोंगरे व फिरते पथक वनरक्षक. पी.पी. राठोड यांचेसह अनेक वनकर्मचारी सहभागी झाले होते. या धाडीत पोलिस विभागाचा सक्रिय सहभागही होता. या संयुक्त कारवाईमुळे आरोपींना नमते घ्यावे लागले. पुढील तपास अप्पारावपेठचे वनपाल श्रीराम सज्जन हे करीत आहेत.
वनविभागाचे हे सलग धाडसत्र व तातडीची कृती पाहता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. अप्पारावपेठ परिसरात अवैध सागी तस्करीला घालण्यासाठी वनविभागाची मोहीम आता अधिक जोमाने राबवली जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.