

Teak Wood Seizure
किनवट : वनविभागाच्या पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोमवारी सकाळी कोठारी गाव शिवारातील मोकळ्या पडीत जागेत अवैधरित्या साठवलेले नऊ सागी कट साईज नग जप्त केले. 0.2194 घनमीटर भरलेल्या या सागवानची किंमत बाजारभावानुसार सुमारे 06 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
वनविभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.08) रोजी सकाळी दहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक केशव वाबळे आणि किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक के. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पी.एल.राठोड यांच्या नेतृत्वात वनपाल चिखली बु.चे वनपाल बी. टी जाधव, वनरक्षक बालाजी झंपलवाड, रवी बाबुराव दांडेगावकर आणि वाहन चालक बाळकृष्ण आवले यांनी कोठारी परिसरात शोध घेत कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान कोठारी गाव शिवारातील एका मोकळ्या ओसाड जागेत जमिनीमध्ये लपवून ठेवलेले अवैध सागी कट साईज नऊ नग आढळून आले. मोजदादीनंतर ते 0.2194 भरले असून, त्याची बाजारातील किंमतीप्रमाणे सुमारे 06 हजार रुपये आहे. ज्या तस्कराने हा सागी माल बेकायदेशीररित्या दडवून ठेवला, त्याचा शोध घेणे सुरू आहे.
वनविभागाने नियमांनुसार अवैध सागी नग जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध वन गुन्हा दाखल केला आहे. सध्या किनवट तालुक्यातील सर्व वनविभागात सागी तस्करांच्या या अवैध व्यापाराविरुद्ध कडक उपाययोजना करणे सुरू असून, यात अप्पारावपेठ, बोधडी, चिखली आदी ठिकाणी लाखो रुपयांचे अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे.
“प्राकृतिक साधनांचा शाश्वत उपयोग सुनिश्चित करणे व अवैध कृत्यांविरुद्ध कटिबद्धपणे लढा देणे हेच आमचे प्रमुख कार्य आहे,” असे प्रादेशिक किनवट वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल. राठोड यांनी या कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट केले.