

How much can you spend on the municipal elections? The main questions asked in the BJP interviews in Nanded
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी शहरातील २० प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे 'दूसरे पर्व' पार पाडणाऱ्या व श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या भाजपाच्या स्थानिक मुलाखतकर्त्यांनी मुलाखत देणाऱ्यांना सामान्य सर्वसाधारण प्रश्न विचारतानाच 'तुम्ही खर्च किती करू शकता', या प्रश्नावर जोर दिल्याचे समोर आले आहे.
मनपा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्याच्या विषयात भाजपाने आघाडी घेतली, तरी पहिल्यांदा तीन निवडक मुलाखतकर्त्यांनी येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात गेल्या आठवड्यात घेतलेल्या 'हायटेक' मुलाखतींचे पहिले पर्व पक्षामध्ये वादग्रस्त ठरल्यानंतर मनपा निवडणुकीचे प्रमुख डॉ. अजित गोपछडे यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात शनिवारपासून मुलाखतीचे दुसरे पण अधिकृत पर्व सुरू झाले. पहिल्या दिवशी १० प्रभागांतील सुमारे दीडशे इच्छुकांच्या 'वन टु वन' मुलाखती झाल्याची माहिती देण्यात आली.
मुलाखती घेणाऱ्यांत खा. अजित गोपछडे यांच्यासह संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, महानगराध्यक्ष अमर अनंतराव राजूरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू लक्ष्मीकांत देशमुख आणि माजी मंत्री द. पां. सावंत यांचा समावेश होता. पहिल्या मुलाखत पर्वात दूरदृश्य प्रणालीतून सहभागी झालेले आणि काही इच्छुकांना चिकित्सकपणे प्रश्न विचारणारे पक्षप्रभारी खा. अशोक चव्हाण यांनी या दुसऱ्या पर्वात आपला सहभाग टाळल्याचे दिसून आले. असे असले, तरी त्यांचे विश्वासू पक्षप्रवक्ते संतुका रामराव पांडागळे यांनी दुसऱ्या पर्वामध्ये प्रभाग क्र. २साठी सपत्नीक मुलाखत दिली. पांडागळे यांच्याप्रमाणेच चव्हाणांच्या इतर समर्थकांनीही या पर्वातील मुलाखतीमध्ये आपला सहभाग नोंदविला.
पहिल्या पर्वामध्ये भाजपाचे १५ अत्तिभ्थर अलगावकरवर्षांपूर्वीचे महानगराध्यक्ष चैतन्यबापू देशमुख यांना तुम्ही पक्षात कधीपासून आहात, असा बाळबोध प्रश्न नवख्या नरेन्द्र चव्हाण यांनी विचारला होता; पण हेच देशमुख दुसऱ्या पर्वामध्ये मुलाखत घेणाऱ्यांसोबत विराजमान झाल्याचे तर नरेन्द्र चव्हाण मुलाखत घेणाऱ्या चमुमध्ये नसल्याचे दिसून आले.
दुसऱ्या दिवशीच्या पर्वात मुलाखत देणाऱ्या अनेक इच्छुकांना या मुलाखती म्हणजे केवळ उपचार असल्याचे जाणवले. त्यांतील एकाने दिलेल्या माहितीनुसार मुलाखतकर्त्यांनी अतिशय जुजबी स्वरूपाचे प्रश्न विचारले. नाव काय, शिक्षण किती अशी प्राथमिक माहिती विचारत विचारत उमेदवारी दिल्यास तुम्ही खर्च किती करू शकता, या प्रश्नावर भर देण्यात आला. काही उमेदवारांनी खर्चाची ऐपत सांगितली, तर काहींनी अमर्याद खर्च करण्याची तयारी दर्शवून मुलाखतकर्त्यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला.
नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याचे आव्हान !
खा. अशोक चव्हाण यांनी पावणेदोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काही आठवड्यांतच नांदेड मनपाचे अनेक माजी नगर सेवक भाजपामध्ये दाखल झाले. त्यांच्यातील बहुसंख्य पुन्हा निवडणूक लढविण्यास सज्ज झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला मागील अनेक वर्षांपासून शहरामध्ये भाजपासाठी काम करणारे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे अनेक जुने कार्यकर्तेही पक्षाच्या केंद्रातील आणि राज्यातील सत्ताकाळात नगरसेवक होण्यास इच्छूक आहेत. नव्या आणि जुन्ऱ्यांचा मेळ योग्यप्रकारे घालण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे.