

He broke his wife's jewelry and used the money to help flood victims.
निवघा बाजार, पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्तांसाठी देवस्थान, सरकारी कर्मचारी आर्थिक मदत करीत आहेत. वरचेवर मदतीचा ओघ वाढत आहे. परंतु, मदत करण्याची ऐपत नसताना हदगाव तालुक्यातील माटाळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी पत्नीचे दागिने मोडून तब्बल ५१ हजार रुपयांची मदत केल्याने या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हदगाव तालुक्यातील माटाळा येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर सुभाषराव शिंदे हा कामानिमित्ताने महागाव (जि.यवतमाळ) येथे मुलाबाळांसह राहतो. अडल्या नडल्याची मदत तो नेहमीच करतो. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांकरिता अनेकजण मदत देत आहेत. या मदतीत आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून काहीतरी मदत द्यावी अशी इच्छा झाली. परंतु जवळ पैसा नाही.
तेव्हा त्यांची पत्नी प्रगती शिंदे यांना मदती संदर्भात चर्चा केली. परंतु आपल्याकडे तितकी रक्कम नाही. तुझे दागिने मोडले तर दागिने आणि माझ्या जवळचे मिळून ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता आपण देऊ शकतो, असे त्याने पत्नीला सांगितले. पत्नी प्रगती शिंदे यांनी त्यांच्या या मागणीला होकार देत अंगावरील दागिने मोडून ५१ हजार रुपयांची रक्कम जमा करून महागाव येथील तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी (दि.३) तहसीलदार यांच्याकडे दिली.