

हदगाव: राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या हदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी सत्तापालट घडवून आणला आहे. माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सूनबाई रोहिणी भास्करराव वानखेडे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला आहे. या विजयामुळे हदगावमध्ये उद्धवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी वानखेडे १२९३ मताधिक्य मिळवत विजयी झाल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ०७ जागा, आघाडी: ०८ जागा तर काँग्रेस: ०५ जागा मिळाल्या आहेत.
नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार रिंगणात होते. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या कुमुद सुनील सोनुले यांनी अल्पआघाडी घेतली होती, मात्र नंतर रोहिणी वानखेडे यांनी जोरदार मुसंडी मारत शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. १० प्रभागांतील २० जागांसाठी ७३ उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीत मतदारांनी पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवारांच्या कार्याला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले.
गेल्या निवडणुकीत आमदार असतानाही शिवसेनेला केवळ ८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी खासदार नागेश आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत ७ जागांवर विजय मिळवला. विशेषतः प्रभाग ५, ७, ८ आणि ९ मध्ये शिवसेनेने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला.
गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती आणि मुस्लिम मतदारांची मोट बांधून 'एक तीर दोन शिकार' करण्याचा काँग्रेसचा डाव रोहिणी वानखेडे यांच्या झंझावातापुढे टिकू शकला नाही. प्रभाग ४ मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मतविभाजन होऊन फायदा होईल ही काँग्रेसची अपेक्षाही फोल ठरली.