

तामसा : हदगाव तालुक्यातील आष्टी वीज सर्कलअंतर्गत येवली, डोरली, जहागीर उमरीसह अनेक गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे.
डीपीडीसी बैठकीत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न जोरदारपणे उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, बैठकीनंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी येवली येथे रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत वीज न आल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
ग्रामीण भागात किरकोळ तांत्रिक बिघाड झाला तरी संबंधित गावापुरती दुरुस्ती करण्याऐवजी अनेक गावांचा वीजपुरवठा एकाच वेळी बंद केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शेतीपंप, पिण्याचे पाणी, लघुउद्योग, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. "१२ तास वीजपुरवठा" अशा घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा संतप्त नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशाराही देण्यात येत आहे.