लग्नाच्या अगोदरच नवरदेवाने जीवन संपवले

उमरी तालुक्यातील सिंधी येथील घटना, दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर ; 3 मे रोजी होता विवाह...
Life Ended News
Life Ended News
Published on
Updated on

उमरी : तीन मे रोजी विवाह समारंभ होता. लग्न पत्रिकाही वाटप करण्यात आल्या. कापडासह किराणामाल, भांडी, सोने, चांदी, मणी मंगळसूत्राची खरेदी होऊन लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. परंतु रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी म्हणून गेलेल्या नवरदेवाने शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवली. ही खळबळजनक घटना उमरी तालुक्यातील सिंधी येथे दिनांक 30 एप्रिल रोजी मध्यराञी घडली. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिंधी येथील तरुण अनिल तुकाराम गाढे (वय 23 वर्ष ) याचा 3 मे रोजी विवाह होणार होता. कॅनॉलला पाणी आल्याने रात्रीच्या वेळी शेताकडे पाणी देण्यासाठी म्हणून तो गेला होता. त्यातच लाईट गेली म्हणून घरी येत असल्याचे घरच्यांना सांगितले होते. परंतु तो घरी परत आलाच नाही. कॅनाॅलच्या बाजूस असलेल्या एका शेतात आखाड्यातील पत्राच्या खाली असलेल्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. याचा मृतदेह लटकत असल्याचे आढळून आले. ही घटना (दि.३०) मध्यरात्री अंदाजे रात्री २.३० ते सकाळी ८.३० दरम्यान घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस अमंलदार सुनिल कोलबुद्धे अरविंद हैबतकर, बालाजी ऊमेवार, रामचंद्र जाधव घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रात्री सिंधी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचा भाऊ शंकर तुकाराम गाढे यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणी कुणाचीही तक्रार आली नाही. सत्य प्रकार का आहे? याबाबत पोलिस अधिक तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी सांगितले आहे.

वधू वर कुटुंबासह विवाह मंडपात शांतता...

अनिलचा विवाह मुदखेड तालुक्यातील निवघा येथे 3 मे रोजी होणार होता. त्याची संपूर्ण तयारी झाली होती. परंतु नवरदेवाने जीवन संपवल्याने वधू वर कुटुंबासह विवाह मंडपी स्मशान शांतता पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news