

मुदखेड ( नांदेड ) : मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव ते कामळज दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेल्या या रस्त्याची चार महिन्यात अक्षरशः चाळण झाली असून राज्य शासनाचे जवळपास १ कोटी ८० लाख मंजूर झाले. त्यापैकी १ कोटी कंत्राटदाराला देण्यात आले असून या निधीचा चुराडा झाल्याने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागातील ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रोहीपिंपळगाव ते कामळज दरम्यान माळकौठा रस्त्याला जोडणाऱ्या या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे अंतर केवळ २:६९ किलोमीटरसाठी ०१ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु या निधीतून रस्त्यांचे काम वादग्रस्त गुत्त्-ोदार मे.बी.जी.भास्करे आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा सं. मते यांच्या संगनमताने ऐन पावसाळ्यात केवळ चारच महिन्यांत रस्ताचे होत्याचे नव्हते झाले आहे. रोहीपिंपळगाव ते कामळज या रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने गिट्टी चुरी, मुरूम टाकून दबाई करुन हा रस्ता सुस्थितीत केला गेल्याची चर्चा आहे. रस्त्याचे काम होऊन केवळ दोन महिने झालेले नसताना, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरूप येते, ज्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते, त्यामुळेच हा रस्ता इतक्या लवकर खराब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्याच्या बाजूला माती भराव न केल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी डांबर आणि खडी पूर्णपणे निघून गेल्याने फक्त मातीचा चिखलमय रस्ता शिल्लक राहिला आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून तयान झालेल्या रस्त्यांची ही अवस्थ पाहता, बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाड करण्याची मागणी संबंधित गावच्य ग्रामस्थांकडून होत आहे.
रोहीपिंपळगाव ते कामळज रस्त्यांच्या कामाचे कंत्राट मे. बी. जी. भास्करे यांना देण्यात आले. परंतु मे. भास्करेनी परस्पर दुय्यम कंत्राटदार (राम मोहिते रा. जालना) यांना त्या रस्त्याचे काम करण्यासाठी दिले. त्या रस्त्याचे काम मे-जून महिन्यात सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत जवळपास ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून एक कोटी रुपये निधी संबंधितांना वर्ग करण्यात आलेला आहे. त्या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था होऊन जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला सांगण्यात येईल.
कृष्णा सं. मते, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था विभाग नांदेड.