

Sachin Vananje's funeral in Degloor
देगलूर : सीमाभागात कर्तव्यावर असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचे श्रीनगर परिसरात वाहन दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) दुपारी १ च्या सुमारास घडली होती. त्यांचे पार्थिव श्रीनगर विमानतळावरून हवाई मार्गाने पाठवण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सीमाभागात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याने श्रीनगरची सर्व विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पार्थिव श्रीनगर ते दिल्ली रस्ते मार्गाने आणण्याचे ठरले. त्यामुळे गुरूवारीऐवजी शुक्रवारी (दि.९) सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून देगलूर नगरपालिका शेजारी अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले आहे.
तालुक्यातील तमलूर येथील मूळनिवासी व सध्या देगलूर येथील फुलेनगर भागात राहणारे सचिन वनंजे हे २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात रूजू झाले होते. ते मंगळवारी (दि. ६) श्रीनगर मध्ये कर्तव्यावर असताताना जवानांना घेऊन जात असताना त्यांचे वाहन ८ हजार फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांचे पार्थिव बुधवारी (दि. ७) श्रीनगर विमानतळावरून हवाई मार्गाने हैदराबाद मार्गे देगलूर येथे पाठवण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सीमाभागात गोळीबार सुरू झाल्यामुळे श्रीनगरची विमानसेवा तत्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीत बदल करून जवान वनंजे यांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्लीला रस्तामार्गे चारचाकी वाहनाने पाठविण्याचे निश्चित झाले. मात्र, हा रस्ता मार्ग पूर्ण करण्यासाठी १४ तासांचा कालावधी लागत असल्याने एक दिवस विलंब झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दि. ८ रोजी दुपारी २ च्या सुमारास वनंजे यांचे पार्थिव दिल्ली येथे पोहोचून संध्याकाळी ७.५० च्या विमानाने हैदराबाद येथे ९.५० वाजता पोहोचेल आणि तेथून रस्तामार्गे देगलूर येथे मध्यरात्री राहत्या घरी दाखल होईल,अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी व प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अंत्ययात्रा शुक्रवारी (दि. ९) सकाळी ८.३० वाजता राहत्या घरून निघेल. तेथून शिवाजी महाराज पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधी चौक, बसवेश्वर महाराज पुतळा, हनुमान मंदिर, जामा मस्जिद, बौद्ध विहार, अमरदीप हॉटेल ते नगर परिषदच्या बाजूस मोकळ्या जागेत अंत्यविधी होणार आहे.