Nanded News : हणेगावच्या आश्रम शाळेत ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी

आश्रमशाळेच्या निकृष्ट अन्नाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
School meal food safety
शालेय आहारFile Photo
Published on
Updated on

हणेगाव : देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी (दि.९ ) रात्री विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व पोटाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडताच त्यांना रात्री उशिरा देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हणेगाव येथील या निवासी आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणात चिकनचा समावेश असलेले मांसाहारी भोजन देण्यात आले होते. मात्र, जेवणानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासनाची धावपळ सुरू झाली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तब्बल ३२ विद्यार्थ्यांना रात्री सुमारे दहा वाजताच्या दरम्यान देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपचारासाठी दाखल झाल्याने रुग्णालयातही मोठी लगबग झाली. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पाटील यांनी सांगितले.

निवासी आश्रमशाळेत राहणारे विद्यार्थी हे प्रशासनाच्या देखरेखीखाली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या गुणवत्तेपासून त्यांच्या आरोग्यापर्यंत प्रत्येक बाबतीत खबरदारी घेणे, ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, एकाच जेवणानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेची केवळ औपचारिक चौकशी न करता भोजनाचा नमुना, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघराची स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, चिकनची खरेदी व साठवणूक तसेच भोजन तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी यासह संपूर्ण व्यवस्थेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

मोठा अनर्थ टळला; मात्र जबाबदारी निश्चित होणार का?

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. मात्र, ३२ विद्यार्थ्यांना एकाच वेळी विषबाधेसदृश लक्षणे निर्माण होणे, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांना नेमका त्रास कशामुळे झाला, भोजनामध्ये काही त्रुटी होत्या का आणि संबंधितांकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा छडा लावणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित अशा गंभीर प्रकारात दोष आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई होणार का? हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news