नांदेड, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून फेसबुकवर पोस्ट केल्याच्या कारणावरून काही कार्यकर्त्यांनी लोहा शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संतोष बडवळे यांना एका फार्म हाऊसवर नेऊन मंगळवारी (दि.१) रात्री मारहाण केली. यात वडवळे रक्तबंबाळ झाले असून त्यांची दोन बोटेही छाटली आहेत. बुधवारी (दि.२) रात्री उशिरापर्यंत नांदेड ग्रामीण ठाण्यात ८ ते १० जणांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी दिली. हे कार्यकर्ते भाजपचे असल्याचा आरोप वडवळे यांनी केला.
वडवळे यांनी फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली होती. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर पोस्ट का टाकली, म्हणत पडवळे यांच्यासोबत वाद घातला. यानंतर मंगळवारी रात्री वडवळे यांना बळजबरीने एका फार्महाऊसवर नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. तसेच पाठीवर वण उमटेपर्यंत झोडपण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, नांदेड शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी वडवळे यांना खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी पहाटे दाखल केले.
केवळ फेसबुकवर पोस्ट केली म्हणून वडवळे यांना जबर मारहाण भाजप कार्यकत्यांनी केली असली तरी, खरे कारण काय आहे, हे पोलिस तपासात पुढे येईलच. दरम्यान मारहाणीच्या प्रकरणात एका माजी जिल्हा परिषद सदस्याचा सहभाग असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.