

नांदेड : कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकाटातून शेतकरी बाहेर निघायला तयार नाही. असे असतानाही शासन मात्र, मदतीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. परिणामी, नापिकी, बँकांचे कर्ज कसे फेडावे, संसाराचा गाडा कसा हाकावा, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे या विवंचनेतून शेतकरी जीवनयात्रा संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. जिल्ह्यामध्ये आक्टोबर महिन्यामध्ये २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे वास्तव समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामध्ये शेतासह पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. परिणामी, हतबल झालेला शेतकरी आता जगून काहीच फायदा नाही, असे समजून टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. आक्टोबर महिन्यामध्ये २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या असून, जुलै ते आक्टोबर या चार महिन्यातील ५४ मदतीचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.
नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच पाऊस जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. सततच्या या पावसाने उरली सुरली पिकेही हातची गेली आहेत. याचा रब्बी हंगामाला फटका बसत आहे. शेतीसमोरील या संकटामुळे आणि बँकांच्या कर्जाचा बोजा वाढत असल्याने काही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. सतत होणारी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी २०२५ पासून ते ऑक्टोंबर या दहा महिन्यात १४५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दहा महिन्यातील शेतकरी जीवनयात्रा संपवल्याची आकडेवारी अशी...
जानेवारी १०
फेब्रुवारी १२
मार्च १५
एप्रिल १८
मे १०
जून ९
जुलै १४
आगस्ट १६
सप्टेंबर १७
आक्टोबर २४
एकूण - १४५
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार द्यावा
कर्जबाजारीपणामुळे किंवा सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची जीवनयात्रा संपविली तर, त्या शेतकऱ्याच्या कुटूंबीयांना शासनाकडून एक लाख रूपयांची मदत दिली जाते. जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी ही प्रकरणे आली. त्यात ८३ प्रकरणे मदतीस पात्र ठरली. तर ८ अपात्र ठरविण्यात आली असून ५४ प्रकरणे चौकशी करीता प्रलंबित आहेत. प्रशासनाने गतीने प्रकरणे निकाली काढून शेतकरी जीवनयात्रा संपविलेल्या कुटूंबीयांना आधार द्यावा, अशी मागणी या कुटूंबीयांमधून जोर धरत आहे.