

उमरी (जि. नांदेड) : मद्यधुंद अवस्थेत सुसाट कार चालवणाऱ्या एका चालकाने बुधवारी (दि.१३) सायंकाळी शहरात व परिसरात अक्षरशः थरार निर्माण केला. उमरी-कारेगाव रस्त्यापासून सुरू झालेल्या या जीवघेण्या प्रवासात चालकाने चार दुचाकीस्वारांना उडवले, ज्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. अखेर, संतप्त नागरिकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून या चालकाला शेलगाव शिवारात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेची सुरुवात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उमरी-कारेगाव रस्त्यावर झाली. भरधाव वेगात असलेल्या एका कारने (क्रमांक उपलब्ध नाही) समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, मात्र कार चालकाने गाडी न थांबवता उमरी शहराच्या दिशेने पलायन केले. शहरात प्रवेश करताच त्याने आणखी एका दुचाकीला धडक दिली आणि नांदेडच्या दिशेने सुसाट वेगाने गाडी दामटवली.
एकापाठोपाठ दोन अपघात करून पळून जाणाऱ्या या कारचालकाची माहिती उमरीतील काही जागरूक नागरिकांनी तात्काळ शेलगाव आणि सिंधी गावातील आपल्या सहकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच सिंधी गावाजवळ शंभरहून अधिक ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. समोर गर्दी पाहून चालकाने गाडी पुन्हा मागे फिरवून शेलगावच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत शेलगाव येथील शेकडो नागरिकही रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पाठलाग करून कारला अडवले आणि चालकाला गाडीबाहेर खेचले.
कार चालकाने एकूण चार जणांना उडवले, ज्यात एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. : उमरी, शेलगाव आणि सिंधी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे चालकाला पकडण्यात यश आले. या संपूर्ण थरारनाट्याची माहिती मिळताच उमरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे उमरी शहरात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. उमरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.