

Inspirational Story Nanded
भागवत गोरे
कंधार : "मनगटात बळ नाही, म्हणून काय झालं, पंखात भरारी घेण्याची जिद्द अजूनही कायम आहे," याचीच प्रचिती आज कंधार तालुक्यातील शिवाजी कॉलेज नवरंगपुरा येथे पाहायला मिळाली. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, जन्मताच दोन्ही हात नसलेल्या उबाळे सुरज शिवराज या दिव्यांग विद्यार्थ्याने चक्क पायाने इंग्रजीचा पेपर लिहून उपस्थित सर्वांची मने जिंकली.
राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेचा पहिलाच दिवस आणि कठीण समजला जाणारा इंग्रजीचा विषय. अनेक धडधाकट विद्यार्थी दडपणाखाली असताना, कंधार शहरातील नवरंगपुरा येथील श्री शिवाजी कॉलेज केंद्रावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. या विद्यार्थ्याला निसर्गाने दोन्ही हात दिले नाहीत, मात्र त्याने या उणीवेला कधीही आपले अपयश मानले नाही.
वर्गातील इतर विद्यार्थी बाकावर बसून हातानी पेपर लिहीत असताना, सुरज मात्र बाकावर बसून मोठ्या एकाग्रतेने आपल्या पायाच्या अंगठ्यात पेन धरून शब्दांमागून शब्द कागदावर उतरवत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि लिहिण्याचा वेग पाहून परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, केंद्र संचालक अशोक वरपडे, प्राचार्य मुरलीधर घोरबांड, आणि शिक्षण विस्तार अधिकारी थक्क झाले.
अपंगत्व हे शरीराला असतं, मनाला नाही. माझा मुलगा जन्मताच दिव्यांग आहे. त्याचे जेवण पायानेच म्हणजे पायच हात आहेत. दहावीला त्याने ६४ टक्के मार्क घेतले होते. माझ्या मुलाची जिद्द पाहून आजच्या पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याची ही धडपड समाजासाठी प्रेरणादायी आहे. याचा मला अभिमान आहे
— शिवराज उबाळे, वडील (गाडेगाव ता. जि. नांदेड)
सूरज दिव्यांग असल्यामुळे त्याला परीक्षेत पेपर लिहण्यासाठी लेखनिक घेता आला असता. परंतु त्याने स्वाभिमानाने आणि ताठ मानेने आहे त्या व्यंगत्वावर मात करत पुढे जाण्याचा आणि परिस्थितीशी दोन हात करत लढण्याचा जगाला संदेश दिला आहे.
- प्राचार्य मुरलीधर घोरबांड, श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंधार
दोन्ही हात नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर शिक्षण सुरू ठेवणाऱ्या या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने दिलेला हा पेपर केवळ उत्तरपत्रिका नसून, त्याच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि यशाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे.