Nanded District Bank Election Results - जिल्हा बँकेवर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

पॅनेलला २१ जागा; जवळगावकर, केशवे, देशमुख यांचा निसटता विजय
Nanded District Bank Election Results
Nanded District Bank Election Results
Published on
Updated on

नांदेड - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने १० जागा पटकावल्या असून उर्वरित दोन जागांवर स्वतंत्र उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बहुचर्चित भोकर मतदारसंघातील तिन्ही जागांवर चव्हाण समर्थकांनी बाजी मारली आहे.

या निकालासोबतच बँकेच्या २३ जागांपैकी शेतकरी विकास पॅनेलच्या खात्यात २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत या पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. रविवारी १२ जागांसाठी १६ केंद्रांवर २५.९४ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी १६ टेबल लावण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता.

दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. तालुकास्तरीय अगटातून पाटील संगीता विठ्ठल (नांदेड) (मते ३३), कदम बालाजी रामजी (अर्धापूर) (मते ३०), जाधव मारोती आनंदराव (मुदखेड) (मते ३५), देशमुख विजयसिंह बाळासाहेब (देगलूर) (मते ४०), रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण (धर्माबाद) (मते २७), जाधव राजू गंगाधर (भोकर) (मते ४७), पाटील कृष्णा नागेश (हदगाव) (मते ६२), पवार माधव निवृत्तीराव (हिमायतनगर) (मते ११), केशवे राजेंद्र नामदेव (माहूर), (मते २०) यांचा विजय झाला. यापैकी पाटी संगीता विठ्ठल आणि पाटील कृष्णा नागेश हे दोघे स्वतंत्र उमेदवार असून उर्वरित सातही उमेदवार शेतकरी विकास पॅनेलचे आहेत.

आरक्षित तीन जागांवर झालेल्या निवडणुकीत पाटील अनिल गोपाळराव (ओबीसी) (मते १०३१), मुसळे रामचंद्र विठ्ठलराव (अनु. जाती/अनु. जमाती) (मते १०६८) आणि दहिफळे ज्ञानेश्वर ओमप्रकाश (भ. वि. जाती/जमाती व वि.मा.प्र.) या शेतकरी विकास पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. बँकेच्या उर्वरित ११ जागा याआधीच बिनविरोध निघाल्या असून यात कवळे मारोतराव व्यंकटराव, चिखलीकर देवरे-प्रणिता पंकजराव, केराम भिमराव रामजी, पाटील मीनल निरंजन, राठोड तुषार गोविंदराव, पाटील चिखलीकर प्रतापराव, चव्हाण श्रीनिवास व्यंकटराव, लुटे शिवराम तुकाराम, देशमुख कैलास श्रीनिवासराव, पाटील सुशिलाबाई हणमंतराव, पवार पुनम राजेश यांचा समावेश आहे. १२ जागा बिनविरोध काढण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपयश आल्यामुळे या जागांवर रविवारी मतदान घेण्यात आले होते.

५ उमेदवारांचा दारूण पराभव

या निवडणुकीत नशीब अजमावणाऱ्या पाच उमेदवारांना दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. मुदखेड मतदारसंघातून पाटील (व्यवहारे) मारोतराव यांना १ मत, अर्धापूरमधील राजेगोरे ज्ञानेश्वर बाबूराव यांना ४, धर्माबाद येथील जाधव गोविंदराव शंकरराव यांना ४, भोकरमधील कदम माधव कामाजीराव यांना ९ आणि हदगाव येथील कदम चंद्रशेखर राजाराम यांना केवळ ८ मते मिळाली.

संवाद आणि समन्वयाचे यश!: खा. चव्हाण

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला मिळालेले घवघवीत यश हे सर्वपक्षीय संवाद आणि समन्वयाचे यश असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.

तिघांचा निसटता विजय

या निवडणुकीत माजी आमदार माधवराव जवळगावकर यांचा अवघ्या एका मताने, विजयसिंह देशमुख (देगलूर) यांचा तीन मतांनी आणि राजेंद्र केशवे (माहूर) यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला आहे. या तिन्ही जागांवर अटीतटीच्या लढतीत शेतकरी विकास पॅनेलच्या वरील तिन्ही उमेदवारांनी निसटता विजय मिळवला असला तरी प्रतिस्पर्धी उमेद‌वारांनीही या तिघांनाही चांगलेच जेरीस आणले होते, हे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news