

नायगाव : नांदेड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्र हादरवून टाकणारा प्रकार उघड झाला आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारावर बदली व संवर्ग लाभ घेणाऱ्या शिक्षकांची चौकशी सुरू होताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
नायगाव तालुक्यातील ३३ शिक्षकांची लोहा, देगलूर, किनवट व माहूर तालुक्यातील मिळून तब्बल २५८ शिक्षकांना जिल्हा परिषदेत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सोमवारी, दि. २२ रोजी जि.प. कार्यालयात हे मोठे चौकशी सत्र भरवण्यात आले. या सुनावणीवर संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचे डोळे लागले आहेत. या प्रकरणात फक्त सामान्य शिक्षक नाहीत तर मानाची पदे भूषवलेले, तसेच राजकीय पाठबळ असलेले अनेक शिक्षक चौकशीत अडकले आहेत. पत्नीच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावानेही दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून बदलीचा लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
खरं तर दिव्यांग असलेल्या शिक्षकांचा हेतू मदत मिळवणे हा असतो. पण काही बनवेबाजांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन संवर्ग एकमध्ये जागा मिळवली, तर खरीख री दिव्यांग असलेले शिक्षक दुर्लक्षित राहिले आहेत.
दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र तपासणीचे आदेश दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शिक्षक चौकशीच्या विळख्यात आले आहेत. समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश असून फसवणूक करणाऱ्यांची नावे लपवली जाणार नाहीत, असा जनतेचा ठाम विश्वास आहे.
या प्रमाणपत्र घोटाळ्यात शिक्षण गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व काही जि.प. अधिकारी-कर्मचारीही सामील असल्याची जोरदार चर्चा आहे. जर हे खरे ठरले तर जिल्हा परिषदेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा भंडाफोड ठरणार आहे. या चौकशीचा निकाल कोणाचा बचाव करतो आणि कोणाचे भांडाफोड करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.