

Deglur Youth Electrocuted
देगलूर : तालुक्यापासून १० कि.मी अंतरावर असलेल्या वन्नाळी येथील युवकाचा विहिरीत पोहताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वन्नाळी येथील मंगेश बालाजीराव पाटील वय २१ वर्ष याने मित्रांसमवेत वन्नाळी आणि चैनपुर शिवारातील भुजंग दशरथराव पाटील यांच्या विहिरीत पोहायला गेला असता, इतर मित्रांना विजेचा शॉक लागत असल्याची जाणीव होत असतानाच तो विहिरीतून वर आलाच नाही. कारण मंगेशला विहिरीत विजेचा जबर शॉक लागल्यामुळे तो विहिरीबाहेर येवू शकला नाही. याची माहिती मित्रांनीच गावात दिल्यानंतर गावकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेत मंगेशला पाण्यातून वर काढले परंतु तोपर्यंत मंगेशचा मृत्यू झाला होता. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे दाखल करण्यात आला होता. शविच्छेदना नंतर रात्री अंत्यविधी करण्यात आले आहे. मंगेश हा अभ्यासात हुशार होता. तो नायगाव येथील (आय. टी. आय.) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.त्याच्या अकाली निधनाने कुटुंबासह वन्नाळी गावावर शोककळा पसरली आहे.
सदरील प्रकरणाचा पंचनामा करून देगलूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम हिंगोले हे करीत आहेत.