

Nanded Darshvela Amavasya Celebration
धोंडीबा बोरगावे
फुलवळ : फुलवळसह परिसरात दर्शवेळा अमावास्येचा सण शुक्रवारी (दि. १९) मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सण साजरा करण्यासाठी शेतकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने फुलवळसह परिसरातील शेतशिवारात चैतन्याचे वातावरण होते. सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेतात जाऊन धरतीमसतेचे पूजन केले.
ज्वारी, गहु तसेच विविध कडधान्यांच्या पिकांची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या दिवशी शेतात पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवून सहभोजनाचा आनंद लुटला जातो. या निमित्ताने गावकरी आणि नातेवाईक एकत्र आल्याने शेतशिवारांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दर्शवेळा अमावास्येला ग्रामीण भागात 'वेळ अमावास्या' असेही म्हटले जाते. हा सण मुख्यत्वे दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात साजरा होतो. हा सण म्हणजे धरतीमाता आणि पिकांच्या समृद्धीसाठी केलेली प्रार्थना आहे. पिके जोमात आल्यावर त्यांची पूजा करून भविष्यात उत्तम उत्पादन मिळावे आणि सुख समृद्धी प्राप्त व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.