

नांदेड : शहरातील गोवर्धन घाट व जुना मोंढा भागातील नवीन पुल येथे मागील काही दिवसांपासून पुलावर चढून गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवनयात्रा संपवण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील पंधरा दिवसांत पाच जणांनी टोकाचे पाऊल उचलले होते. त्यांना जीवरक्षकांनी वेळी नदीपात्रता उडी घेऊन वाचवले आहे. तर, वर्षभरात 50 अशा घटना घडल्या आहेत. वाढत्या जीवनयात्रा संपवण्याच्या घटना रोखण्यासाठी महापालिकेने वरील दोन्ही पुलांवर दहा फूट उंचीची लोखंडी जाळी (रेलिंग) बसविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नांदेड शहरातून गोदावरी नदी वाहते. गोदावरी नदीवर एकूण चार पूल आहेत. मात्र, गोवर्धन घाट व जुना मोंढा येथील पुलाच्या कठड्यांची उंची कमी असून सहज चढता येईल, अशी आहे. त्यामुळे गोदवारीत उडी मारण्यासाठी या दोन पुलांचाच जास्त वापर होतो. किरकोळ कारणावरून पती-पत्नींचे भांडणे होताच रागाच्या भरात अनेक जण फोनवर बोलत पुलावरील कठड्यावर चढतात आणि आपली जीवन यात्रा संपवतात. जीवरक्षक, मच्छिमार असलेतर त्यांना वाचवण्यात यश येते. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वर्षभरात 50 जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. यात पती-पत्नींचे प्रमाण सर्वाधिक असून मुले, युवतींचाही काही प्रमाणात समावेश आहे. यातील पन्नास टक्के जणांचा जीव वाचविण्यात आला आहे, असे जीवरक्षक सय्यद नूर यांनी सांगितले.
गोदावरी नदीवरील जुना पूल आणि गोवर्धनघाट पुलावरून विवाहितांसह तरुण व तरुणींच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या पुढाकारातून आणि महापालिकेच्या सहकार्याने दोन्ही पुलांवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम हाती घेतले असून, यामुळे काहीअंशी जीवनयात्रा संपवण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल.
महापालिकेने गोवर्धन घाट व जुना मोंढा या दोन्ही पुलांवर दहा फूट उंचीची लोखंडी जाळी बसविण्याचे काम कामी घेतले आहे. तसेच याठिकाणच्या दुभाजकातही आडवी जाळी बसविण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेला आळा घालण्यास मदत होणार आहे.