

भोकर : खडकावरही उगवण्याची क्षमता असलेल्या डोंगरदऱ्यातील बोरवाडीने तब्बल १६ डॉक्टर घडवीत डॉक्टरांचे गाव म्हणून तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भाकरीचा प्रश्न न सुटलेल्या गावाने उच्च शिक्षण घेत, अनंत अडचणींना सामोरे जात, नवा उच्चांक गाठल्याने इतरांचा बोरवाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
वास्तविक परिस्थिती पाहता दिवाळीपूर्वी शेती आणि मजुरी तर दिवाळीनंतर आंध्रा आणि तेलंगणात जाऊन मजुरी करणारे हे गाव. वर्षानुवर्षे हाच कित्ता गिरवत असताना याच गावातून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर तब्बल १६ एमबीबीएस आणि २ बीएएमएस डॉक्टर घडवीत परिसरात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
किनवट तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कार्यरत वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिव- ाजीराव नागोजी खंदारे सर्वप्रथम औरंगाबाद येथे एमबीबीएसला प्रवेश घेत वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांची प्रेरणा घेऊन आणि तीच परंपरा कायम ठेवत डॉ. दिगंबर गंगाराम बुलबुले (मिरज), डॉ. रामचंद्र अमृतराव कोठुळे (औरंगाबाद), प्रा.डॉ. रंगराज मारुती भिसे (कराड), डॉ. किशोर शेषेराव कोतृळे (सोलापूर) यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेऊन महाराष्ट्रात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहेत. तर प्रा. डॉ. रंगराव भिसे हे विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत व डॉ. राजू शामराव वागतकर (मिरज) यांनी नुकतेच एमबीबीएस पूर्ण केले आहे.
सुमित दुलबा कोठूळे (औरंगाबाद), सुजीत दिगंबर बुलबुले (मुंबई), अक्षय तुकाराम बोले (औरंगाबाद), रोहित दुलबा कोठूळे (नांदेड), यादोजी बालाजी भिसे (नाशिक) मंगेश दिगंबर बुलबुले (मुंबई), यश रंगराव बुलबुले (भोपाळ) हे विविध ठिकाणी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत तर डॉ. वर्षा किशनराव भिसे हिने नुकतेच बीएएमएस पूर्ण केले असून प्राजक्ता सूर्यकांत कोठूळे ही बीएएमएस करीत आहे. यंदासुध्दा गोविद परमेश्वर कोठुळे (जालना), महेश तुकाराम डोले (अहिल्यानगर) व स्नेहा प्रकाश बुलबुले (कर्जत रायगड) यांनी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे.
आदिवासी विकास विभागाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी कितीकिरण पुजार यांच्या दूरदृष्टीमुळे व पुढाकारामुळे आम्हा ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांना प्रा. मोटेगावकर यांच्या आर.सी.सी क्लासमध्ये मोफत प्रवेश दिल्याने त्याचा मला फायदा झाला.
गोविंद कोठूळे (जालना)
विद्यार्थीदशेपासूनच संघर्ष करण्याची सवय होती, अनेक आव्हानांना सामोरे गेलो. काहीतरी करण्याची प्रखर इच्छा होती. पुढे काळोख असतानाही मार्गक्रमण करीत राहिलो. संघर्षाला सामोरे जावे लागले. एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या गावात डॉक्टर घडताना पाहून आनंद होत आहे.
डॉ. शिवाजीराव खंदामे, पहिले डॉक्टर तथा वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मांडवी, किनवट
डॉक्टरांचे गाव घडविण्याचे संपूर्ण श्रेय स्वतः डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आहे. गावात निश्चित धोरण राबविले असते तर ही संख्या काही पटीने वाढलेली दिसली असती. यापुढे आम्ही गावकरी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार आहोत.
गंगाधर वानोळे, तालुका समन्वयक, आदिवासी समाज, भोकर