

माहूर ः जिल्हा परिषदेची भोजंती तलाव प्राथमिक शाळा दि. 4 रोजी शिक्षक अनुपस्थित राहिल्याने पूर्णवेळ बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून दररोज घेतले जाणारे राष्ट्रगीतही सकाळच्या सत्रापासून बंद असल्याचे उघड झाले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी शाळा सकाळच्या सत्रात चालू आहेत, सकाळी 8.30 ते दुपारी 1 या वेळेत शाळा भरविली जात आहे. मात्र, भोजंती तलाव प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शाळा उघडलीच नसल्याची बाब इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आई सुरेखा तळणकर या आपल्या मुलाला शाळेत घेऊन आल्या असता त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी चौकशी केली असता शिक्षकच आले नसल्याने शाळा उघडली नसल्याचे स्पष्ट झाले.
लागलीच त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुदास राठोड यांच्याकडे तक्रार केली. मुख्याध्यापकांशी मी आताच संपर्क साधला असून अर्ध्या तासात शिक्षक येतील, असे त्यांनी सांगितले, मात्र प्रत्यक्षात कोणीही हजर झाले नाही, असे तळणकर यांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक जि.प. शाळांमध्ये शाळा सुरू ठेवणे किंवा बंद ठेवणे, तसेच राष्ट्रगीत घेणे अथवा न घेणे या बाबी शिक्षकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, शुक्रवारची सुट्टी मिळताच ते बाहेर जातात आणि सोमवारपर्यंत निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळेच शनिवारी शाळा बंद ठेवली गेली. शहरातच ही अवस्था असेल तर दुर्गम भागातील परिस्थिती काय असेल?” असा सवाल सुरेखा तळणकर यांनी उपस्थित केला आहे.