

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचा २२ डिसेंबर रोजी वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने बार्टीच्या गेल्या ४६ वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना, ही संस्था केवळ ‘दिवा’ न राहता वंचित-वस्त्यांना संपूर्ण उजेड देणारे ‘उजेडाचे झाड’ ठरावी, असे प्रतिपादन डॉ. प्रेम हनवते (माजी प्रकल्प व्यवस्थापक, संशोधन विभाग) यांनी केले आहे.
बार्टीची सुरुवात २२ डिसेंबर १९७८ रोजी ‘समता विचारपीठ’ या संस्थेच्या रूपाने झाली. संविधानातील कलम ४६ अन्वये अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. कालांतराने संशोधन, प्रशिक्षण आणि योजनांचे मूल्यमापन या गरजांमुळे २००८ मध्ये संस्थेचे नामकरण ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)’ असे करण्यात आले आणि तिला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला.
आज बार्टीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे व पोलीस भरतीसाठी दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप’ (BANRF) अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी आर्थिक पाठबळ दिले जाते. २०१२ ते २०२२ या काळात ३,१०३ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, काही संशोधकांना पेटंटही मिळाले आहेत.
संशोधन विभागामार्फत सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीवर आधारित अभ्यास अहवाल शासनाला सादर केले जातात. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘CCVIS’ प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद झाली आहे. ‘समता दूत’ प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागात योजनांची माहिती पोहोचवली जात असून, संविधान साक्षरता, आरटीई अंमलबजावणी आणि आंबेडकरी साहित्याचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही बार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने विविध आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. पाली त्रिपिटकाचे मराठी भाषांतर प्रकल्पही प्रगतीपथावर आहे.
बार्टीच्या कामाचा थेट परिणाम लाखो कुटुंबांच्या जीवनावर झाला असून, संस्थेतील अधिकारी-कर्मचारी सामाजिक बांधिलकीने कार्यरत असल्याचे डॉ. हनवते यांनी नमूद केले. २०२८ मध्ये बार्टी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार असून, सामाजिक न्याय व समतेचा हा प्रवाह शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बार्टीने अधिक व्यापक स्वरूपात स्वीकारावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेला हार्दिक शुभेच्छा देत, “अंधारलेल्या वस्त्यांसाठी बार्टीने दिवा नव्हे तर उजेडाचे झाड व्हावे,” असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.