कुंडलवाडी, पुढारी वृत्तसेवा
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या विवाहित महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध कुंडलवाडी पोलिसांनी दि. २२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास (२५ वर्षीय) महिलेस मागील चार महिन्यांपासून शारीरिक संबंध ठेव म्हणत संशयित आरोपी पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. यातच दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तिच्या घरात प्रवेश केला. तिच्याशी शरीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. पीडित महिलेने शारीरिक संबंधास नकार देताच संशयित आरोपीने पीडितेला विषारी औषध तोंडात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांत संशयीत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के हे करीत आहेत. संशयित आरोपी अंकुश तुकाराम मामडे यास घटनेच्या बारा तासात कुंडलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरने, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते, धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली.