नांदेड : ऑपरेश फ्लॅश आऊट अंतर्गत सोनखेड पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीतील तसेच नांदेड जिल्ह्यात जनावरे चोरी करणाऱ्या संशयीतांना रविवारी (दि. १५) सायंकाळी अटक केली आहे. त्यात रघुनाथ किशन मगरे (वय ४०), निखिल बालाजी कोल्हे (वय २४, दोघेही रा. काकांडी), निलेश आनंदा हणवते (वय २३, रा. टेळकी), अरविंद भीमराव हटकर (वय २७, रा.ईजळी), आकाश वसंत गजभारे (वय २२, रा. मेंढला), महमद अलताफ महमद आयुब कुरेशी (वय ३२, रा. देगलुरनाका नदिड) यांचा समावेश आहे.
त्यांनी एकूण ४० जनावरे चोरीचे गुन्हे कबुल केले आहे. त्यांच्याकडून जनावरे चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसह जनावरे विक्री केल्याची रक्कम असा एकूण चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या नावावर सोनखेडला आठ तर मुदखेड ठाण्यात तीन गुन्हे असे एकूण ११ गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई सपोनि पांडुरंग माने, पोउपनि वैशाली कांबळे, सपोउपनि गणपत गिते, पोहेका विश्वनाथ हंबर्डे, वामन नागरगोजे, अंगद कदम, शाम बनसोडे, रमेश वाघमारे, त्रिशुल शंकरे, महेश शंकरे, दिगांबर कवळे, संतोषी मल्लेवार, केशव मुंडकर व उत्तम देवकते यांनी केली.