

हदगाव : शासनाच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळूनही एसटी बस गावात थांबत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी अखेर रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. मंगळवारी सकाळी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हदगाव येथील भदंत टेकडीवर बस रोखून धरली आणि आगार प्रशासनाला थेट जाब विचारला. या अनपेक्षित आंदोलनामुळे आगार प्रमुख आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
शासनाने बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी 'अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना' सुरू केली आहे. मात्र, हदगाव आगाराच्या अनेक बसेस भोकर, हिमायतनगर, तळणी, मनाठा, बाळापूर या मार्गांवरील गावांमध्ये थांबतच नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मंगळवारी सकाळी वडगाव, तळेगाव फाटा, डोरली, वाळकी फाटा, ल्याहरी, हाडसणी यांसारख्या थांब्यांवर बस न थांबल्याने अनेक विद्यार्थिनींना खाजगी वाहनांनी कॉलेज गाठावे लागले. याचवेळी, तीच बस पुढे जात असल्याचे पाहून संतप्त विद्यार्थिनींनी संघटित होऊन सकाळी सव्वानऊच्या सुमारास भदंत टेकडी येथे बस अडवली. त्यांनी चालक आणि वाहकाला बस का थांबवली नाही, याचा जाब विचारण्यास सुरुवात केली.
विद्यार्थिनींनी बस रोखल्याचे कळताच, हदगाव पोलीस ठाण्याचे होमगार्ड जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थिनींना समजावण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस अधिकाऱ्याने (एपीआय) फोनवरून विद्यार्थिनींशी बोलताना, "तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही?" असा प्रश्न विचारत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका विद्यार्थिनीने कणखरपणे बाजू मांडत, "आम्ही आगार प्रमुखांना अनेकदा कळवले आहे, तिथले सीसीटीव्ही तपासा," असे सडेतोड उत्तर दिले. या उत्तराने पोलीसही निरुत्तर झाले.
विद्यार्थिनींनी आगार व्यवस्थापकांना (डेपो मॅनेजर) घटनास्थळी येऊन समस्या ऐकून घेण्याची मागणी केली. मात्र, ते हजर नसल्याने त्यांच्या वतीने वाहतूक नियंत्रक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनींची समजूत काढत, एका वहीच्या कागदावर लेखी आश्वासन दिले. या आश्वासनात म्हटले आहे की, प्रत्येक गावातील थांब्यावर एसटी बस थांबवण्यात येईल. सर्व विद्यार्थिनींना काळजीपूर्वक बसमध्ये घेतले जाईल. या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेत बसचा मार्ग मोकळा केला.
या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना या प्रकरणात लक्ष घालून, हदगाव आगाराच्या व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि विद्यार्थिनींच्या प्रवासाची गैरसोय कायमस्वरूपी दूर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.