

हदगाव: तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ३६१) हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. रविवारी ( १८ ऑक्टो) दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या एका विचित्र अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले.
महामार्गावर डागडुजीचे काम सुरू असताना पर्यायी रस्ता उपलब्ध न केल्यामुळे आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे उघड झाले आहे.
नेमका अपघात कसा घडला?
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर भानेगाव फाट्याजवळ महामार्गाच्या डागडुजीचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांनी कोणताही पर्यायी रस्ता (Diversion) उपलब्ध करून दिला नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे, दुरुस्तीचे साहित्य घेऊन फिरणारे वाहन, एक जेसीबी, नांदेडहून आर्णीकडे जाणारा 'आयशर' आणि चाकूरहून चंद्रपूरकडे जाणारी चारचाकी (कार) अशा तीन वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला.
कार्यक्रमासाठी जाताना दुर्घटना
या अपघातातील चारचाकीतील कुटुंब लातूर येथील होते आणि ते सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मनोज रामराव देवगुरे यांच्यासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर येथे जात असताना ही काळंबेर झाली. या अपघातात मनोज रामराव देवगुरे (वय ३४) आणि मंजुषा देवदास आईलवार (वय ३७) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
८ जण गंभीर जखमी
या दुर्घटनेत पियुष देविदास आईलवार (४२), मंजुषा निळकंठ असेवाढ (४०), रामराव देवगुरे (६०), प्रतिभा देवगुरे (५७), दत्तात्रेय अंकुटे (२५), निधी आसेवाड (१४), शरयू असेवाड (७) (सर्व रा. लातूर) आणि आयशर वाहनचालक शाहरुख खान (३४, रा. खंडवा, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने मदत
अपघाताची माहिती मिळताच अंकुश गोदजे, बालाजी ढोरे, राजु तावडे, गजानन देवसरकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक तातडीने मदतीला धावले आणि त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथे दाखल केले. रुग्णालयात डॉ. प्रदीप स्वामी, डॉ. दादाजी ढगे, डॉ. बालाजी पोटे यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले.
महामार्गावर काम सुरू असताना सूचना फलक लावणे आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी हे गांभीर्य न घेतल्यामुळेच हा अपघात घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.