

किनवट : किनवटजवळील अंबाडी घाटात मंगळवारी सकाळी एका तीव्र वळणावर झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाला. जंगलाच्या सखोल परिसरातून जाणार्या अरुंद वळणावर बस व बोलेरो यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.
आज मंगळवारी (1 जुलै) सकाळी अंदाजे 7.15 वाजता एस.टी. बस (एमएच 14, बीटी 2105) ही उनकेश्वरहून किनवटकडे येत असताना अंबाडी घाटात समोरून भरधाव वेगात येणार्या बोलेरो (एपी-02,बीडी 6669) वाहनाची तीव्र वळणावर बसशी समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर बोलेरोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि चालक गंभीर जखमी झाला. बोलेरो वाहन चालवणारे पप्पू व्यंकटेश गंगुलप्पा (वय 42, रा. विनायकनगर, चित्तूर, आंध्रप्रदेश) यांना तातडीने उपचारासाठी आदिलाबादकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती बसचे चालक जी. डी. पंधरे व वाहक जनार्दन वाघमारे यांनी दिली. घटनास्थळी रा.प. किनवट आगार प्रमुख यशवंत खिल्लारे यांनी तत्काळ धाव घेतली. तसेच विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती व विभागीय यंत्र अभियंता अभिजित कोरटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अंबाडी घाटातील अरुंद व धोकादायक वळणांमुळे अशा अपघातांची शक्यता नेहमीच निर्माण होत असते. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत या अपघाताची कोणतीही नोंद किनवट पोलीस ठाण्यात झाली नव्हती. मयत बोलेरो चालकाच्या मृत्यूचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर नोंद होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, घाट परिसरातील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.