

Action taken against sand smugglers of Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील गोदावरी नदीपात्रात ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २ अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी ही तिसरी कारवाई केली आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाला रविवारी (दि. २२) विष्णुप रीजवळील असर्जन शिवारातील गोदावरी नदीपात्रात इंजिन व तराफ्याच्या साह्याने अवैधरीत्या वाळू उपसा करून साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पथकाला २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू, तीन लाख रुपये किमतीचे एक इंजिन, चार लाख रुपये किमतीचे ८ तराफे असा एकूण ७ लाख २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी दोन अज्ञात व्यक्ती पोलिसांना पाहून पळून गेले. त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ग्रामीण पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.