नांदेड जिल्ह्यात पुन्हा भगरीतून विषबाधा; ६० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली | पुढारी

नांदेड जिल्ह्यात पुन्हा भगरीतून विषबाधा; ६० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली

हदगाव, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हयात पुन्हा एकदा भगरीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील जवळपास ६० ते ७० जणांना भगर खाल्यामुळे विषबाधा झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.६) रात्रीपासून रुग्ण शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल झाले आहेत.

विजया एकादशी असल्याने बुधवारी (दि.६) अनेकांनी उपवास केला होता. या उपवासानिमित्त हडसणी, वाळकी, बाभळी, गुरफळी, वाटेगाव, बनचिंचोली, हरडफ, शिवणी, भानेगाव, फळी या गावासह अन्य गावात नागरिकांनी घरी भगर केली होती. दरम्यान, भगराचे सेवन केल्यानंतर नागरिकांना अंगाला थरकाप सुटने, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. एक एक जण उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रूग्णालयात दाखल कोण्यास सुरूवात झाली. उपजिल्हा रुग्णालयात २० ते २५ रूग्ण तर काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्या बाहेर असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याचे उप जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप स्वामी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने दिल्या सुचना

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी, भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी, तसेच पॅकींग दिनांक, अतिंम वापर दिनांक असल्याची खात्री करूनच नागरिकांनी भगर घ्यावी. याशिवाय विक्रेत्यांनी सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. यासोबतच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भगर विक्री करणा-या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणा-या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले आहे.

Back to top button