नांदेड : कंटेनरची दुचाकीला धडक ; दोन जण ठार | पुढारी

नांदेड : कंटेनरची दुचाकीला धडक ; दोन जण ठार

हदगाव; पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनाहून परत येणाऱ्या दुचाकीस्वारास कंटेनर चालकाने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघाजणांचा मृत्यू झाल्याची घटना हदगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदेड-नागपूर महामार्गावरील
मानवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास घडली आहे.

तालुक्यातील मौजे बाभळी येथील रहिवाशी असलेले ग्यानोबा माधवराव नरवाडे (वय ५२ वर्ष) आणि आनंदीदास गणपतराव पांडे (वय ५४ वर्ष) हे दोघे दुचाकीवर देव दर्शनासाठी मानवाडी येथे गेले होते. देव दर्शन करून परत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने  येणाऱ्या कंटेनरने (पी.बी.१०-डब्ल्यू.एच.-०५७१) दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिला. यामध्ये आनंदीदास पांडे हे जागीच ठार झाले तर ग्यानोबा नरवाडे हे गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांनी प्राण सोडला.

या प्रकरणी पंडित माधवराव नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालका विरुद्ध हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रायबोळे हे करीत आहेत.

Back to top button