नांदेड : धर्माबादचे माजी नगराध्यक्ष विनायक कुलकर्णी यांचे निधन

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा : धर्माबाद तालुक्याच्या राजकीय पटलावरील सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष विनायक कुलकर्णी यांचे 30 सप्टेंबर रोजी नांदेड येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. ते राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जात असे.
विनायक कुलकर्णी यांचे कंधार तालुक्यातील धानोरा (मक्ता) हे मुळ गाव. कुलकर्णी यांनी रत्नाळी येथे वास्तव्याला आल्यानंतर धर्माबाद तालुक्याच्या जनतेची मन जिंकली होती. सतत चार दशके धर्माबाद तालुक्याच्या सक्रीय राजकारणात आपला निर्विवादपणे दबदबा निर्माण केला होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या कृतत्वाला पैलू पडले आणि समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ते मा. शरद पवार यांच्या सोबत जोडले गेले.
माजी मंत्री डाॅ. माधवराव पाटील किन्हाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकारणात पुढे आले. माजी मंत्री सुर्यकांताताई पाटील यांच्याशी देखील त्यांचा निकटचा संबंध होता.तसेच माजी आमदार स्व.बापुसाहेब गोरठेकरांच्या सानिध्यात खरया अर्थाने स्थैर्य भेटले आणि विनायकरावांना धर्माबाद तालुक्याचे सर्वोसर्वा म्हणून बिरूदावली भेटली. व ते बाबा नावाने ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या नेतृत्वात सलग दहा वर्षे धर्माबाद नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. ते स्वतः दोन टर्म तर त्यांच्या पत्नी एक टर्म नगराध्यक्ष होत्या. पुढे कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद चे संचालक म्हणून देखील निवडून आले होते.उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांची मर्जीतील विश्वासू म्हणूण ते सर्वश्रुत होते. त्यांनी धर्माबाद शहरात मोठया प्रमाणात निधी मंजुर करून आंत कायापालट केला.
मागील तीन टर्म पासून धर्माबाद नगर पालिकेवर त्यांची एकहाती सत्ता होती.सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे अशा सर्वगुण संपन्न नेत्याचे ३० सप्टेंबर रोजी नांदेड येथे एका रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,चार मुली ,सून , जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.