

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत मराठवाड्यात २३५ उपकेंद्रांत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या पैकी छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यातील दोन उपकेंद्रातील सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या दोन उपकेंद्रातील ८ फीडरवर सुमारे २ हजार ४५२ शेतकरी याचा लाभ घेत आहेत. अशी माहिती सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिली.
राज्यात आजघडीला पाच प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. यात अकोला, कोल्हापूर, बुलढाणा तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे. या पाच उपकेंद्रात १५ फीडरवरून सुमारे ४ हजार ९७१ शेतकरी लाभ घेत आहेत. या सौर प्रकल्पातून १९ मेगावॅट वीज निर्मित होत आहे. या पाच पैकी छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पातून ८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ७५३ तर नांदेड जिल्ह्यातील ६९९ असे २ हजार ४५२ शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळत आहे. शासनाच्या या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून त्यामुळे शेती व अन्य उत्पादने वाढण्यात मदत होणार आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड असे तीन झोन आहेत. संभाजीनगर झोनमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, तर नांदेड झोनमध्ये हिंगोली, नांदेड, परभरणी तसेच लातूर झोनमध्ये लातूर, बीड व धाराशीव जिल्ह्याचा समावेश आहे. या तिन्ही झोनमध्ये २३५ उपकेंद्रात सौर उर्जा पक्रल्प उभारण्यात येणार असून त्यातून १ हजार १३८ मेगावॅट वीज तयार होणार आहे. हे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर निर्मित होणाऱ्या विजेतून सुमारे ३ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून त्यामुळे शेती व अन्य उत्पादने वाढण्यात मदत होणार आहे.