

जळकोट : जळकोट तालुक्यातील वारंवार झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा एकदा हाहाकार माजवत तीन निष्पाप जीवांचे प्राण घेतले. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले तिरुका येथील सुदर्शन माधव घोणशेट्टे (२७), नरसिंगवाडीचे वैभव पुंडलिक गायकवाड (२४) आणि सीआयएसएफ जवान शान मुरहरी सूर्यवंशी (३२) यांचे मृतदेह अखेर शुक्रवारी (दि. १९) शोध पथकांना मिळाले.
दि. १६ सप्टेंबर रोजी तिरुका येथील सुदर्शन घोणशेट्टे हे शेताकडे जाताना तिरु नदीत वाहून गेले होते. त्याच रात्री माळहिप्परगा–पाटोदा खुर्द रस्त्यावरील पुलावरून एक ऑटो रिक्षा वाहून गेली. पाच जण प्रवासी असलेल्या या घटनेत दोन जणांनी पोहून जीव वाचवला, एक जण झाडाला धरून रात्रभर थांबून बचावला; तर वैभव गायकवाड आणि शान सूर्यवंशी वाहून गेले होते.
मृतदेहांचा शोध
शोध पथकांच्या तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर आज सकाळी वैभव गायकवाड यांचा मृतदेह तलावात, दुपारी सुदर्शन घोणशेट्टे यांचा मृतदेह पांडुचूला येथील नदीपात्रात आणि संध्याकाळी जवान शान सूर्यवंशी यांचा मृतदेह मिळाला. मृतदेह पाहताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला आणि परिसरात शोककळा पसरली.
बचावमोहीम आणि प्रशासनाची धावपळ
एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल (अहमदपूर व उदगीर), महसूल, पोलीस, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बचाव आणि शोध मोहीम राबविण्यात आली. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांना भेट देऊन दिलासा दिला. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाहीवर लक्ष ठेवून होते.