

The payments to ladki Bahin have been pending for two months.
उदगीर, पुढारी वृत्तसेवा शहरासह तालुक्यातील हजारो महिलांसाठी आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. छाननीनंतर दोन महिन्यांपासून हप्ता थकल्याने अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक गणित बिघडले आहे.
निवडणूक निकालानंतर जाहीर झालेल्या वाढीव २,१०० रुपयांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये आता अस्वस्थता आणि नाराजी असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीनंतर तरी ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळावेत अशी अपेक्षा लाडक्या बहिणीची आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दरमहा मिळणारी मदत ही केवळ रक्कम नव्हती, तर मुलांचे शिक्षण, फी, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठीचा आधार होता.
मात्र, नोव्हेंबरपासून पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. योजनेसाठी केवायसी, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभ थांबल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींना अजूनही नियमित रक्कम मिळत असली, तरी मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांचे हप्ते थांबले असल्याचे चित्र आहे. यामुळे घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे.